पनवेल : भारतीय हवामान विभागाने रायगड जिल्ह्यासह परिसरात १ ते ५ जुलैदरम्यान मुसळधार ते अति मुसळधार, तर काही ठिकाणी अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पनवेल महापालिका हद्दीतील सर्व शैक्षणिक संस्थांना गुरुवार दि. २ जुलै २०२६ रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबत पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मंगेश चितळे यांनी अधिकृत परिपत्रक जारी केले आहे.
आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५, भारतीय हवामान विभागाच्या पूर्वसूचना तसेच रायगड जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी पनवेल तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शाळा, महाविद्यालये आणि अंगणवाड्यांना एक दिवसाची सुट्टी जाहीर केली आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनानेही आपल्या हद्दीतील सर्व शैक्षणिक संस्थांसाठी हा आदेश लागू केला आहे.
या आदेशानुसार पनवेल महापालिका क्षेत्रातील सर्व सरकारी व खासगी प्राथमिक-माध्यमिक शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, सर्व महाविद्यालये, आश्रमशाळा, व्यवसाय व प्रशिक्षण केंद्रे तसेच इतर शैक्षणिक संस्थांना २ जुलै रोजी सुट्टी राहणार आहे. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. संबंधित सर्व शैक्षणिक संस्थांनी आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करावी, असे निर्देश आयुक्त मंगेश चितळे यांनी दिले आहेत.