Raigad Rain
कळंबोली pudhari photo
रायगड

Raigad Rain Update | मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्याला झोडपले

पुढारी वृत्तसेवा

रायगड : सलग दुसर्‍या दिवशी मुसळधार पावसाने रायगड जिल्ह्याला झोडपून काढले. सोमवारी पहाटेच्या सुमारास काही भागात ढगफुटी सदृष्य पाऊस झाला. नदी किनारी घरांमध्ये पाणी घुसल्याने मोठी वित्तहानी झाली आहे. जिल्ह्यात कोठेही सुदैवाने मनुष्यहानी झाली नसली तरी 23 घरांचे नुकसानासह पशूधनाची हानी झाली आहे.

300 शिवभक्तांची सुटका

पावसाने किल्ले रायगडावरून पायरी मार्गाने 300 शिवभक्तांना जीव मुठीत धरून खाली उतरावे लागले. खबरदारी म्हणून 21 जुलैपर्यंत रायगड किल्यावर पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. मुरुड-अलिबाग तालुक्यातील शाळांना सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली. मंगळवारी देखिल जिल्ह्यातील सर्व शाळा-कॉलेजला सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. आगामी चार दिवसातही पावसाचा यलो अलर्ट असून जिल्हा प्रशासनाने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ

रायगड जिल्हयात पावसाचा जोर वाढला असून 7 जुलै नंतर 8 जुलै रोजी अलिबाग, म्हसळा, मुरुड, माणगाव, रोहा अतिवृष्टीची नोंद झाली. अलिबाग, मुरुड, तळा, म्हसळा या तालुक्यांमध्ये सकाळपासून स्थानिक नाले, नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झालेली होती. सायंकाळी पाण्याची पातळी कमी झाली. सध्या रायगड जिल्ह्यातील तळा तालुका वगळता इतर सर्व तालुक्यात पावसाचा जोर कमी झाला होऊन परिस्थिती नियंत्रणात होती. सर्व नद्यांची पाणी पातळी इशारा पातळीपेक्षा कमी असल्याचे जिल्हा प्रशासनाकडून कळविण्यात आले.

अलिबाग ते रेवदंडा रस्ता सहाण बायपास मार्गावरील पाल्हे पुलावरून एक मोटारसायकल वाहून गेली आहे. मुरुड-साळाव रस्त्यावरील चिकणी पुलाचा भाग वाहून गेल्यामुळे रस्ता खचला आहे. जिल्हा प्रशासनाने सर्व नागरिकांना व शासकीय यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला असून एनडीआरएफचे पथक तैनात ठेवण्यात आले आहे. आगामी चार दिवसातही पावसाचा यलो अलर्ट असून सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.

किल्ले रायगडावर ढगफुटी

महाड / नाते : रायगड-वाळण-बिरवाडी विभागामध्ये झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले होते. सायंकाळी उशिरा किल्ले रायगड परिसरातही ढगफुटी संदर्भात झालेल्या मुसळधार पावसाने 300 शिवभक्तांना जीव मुठीत धरून किल्ले रायगडावरून पायरी मार्गाने खाली उतरावे लागले. अतिवृष्टीमुळे रायगड किल्ला पर्यटक यांच्याकरिता बंद करण्यात आलेला आहे. रायगड किल्ल्यावर पायी जाणारा चित्त दरवाजा व नाणे दरवाजा मार्ग बॅरीकेटिंग करून बंद करण्यात आला आहे. रविवारी रायगड वाडी येथील 40 वर्षीय मनोज खोपकर हा इसम टकमक टोक परिसरात असलेल्या धबधब्यावरून वाहून गेल्याची घटना घडली. एनडीआरएफचे पथक त्याचा शोध घेत आहे.

SCROLL FOR NEXT