पेण : पुढारी वृत्तसेवा
रायगड जिल्ह्यात कापणीला आलेल्या भातपिकाचे पावसाच्या सरींनी नुकसान केले आहे. जिल्ह्यातील 1 हजार 328 शेतकर्यांच्या 471.10 हेक्टर भात शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम कृषी विभागाकडून सुरू आहे. पावसामुळे कापणीची कामे खोळंबली असून पाऊस थांबण्याची शेतकर्यांना प्रतीक्षा आहे.
रायगड जिल्ह्यात 97 हजार 272 हेक्टर क्षेत्रावर भात पिकांची लागवड करण्यात आली आहे. सुरुवातीला लहरी हवामानाचा सामना शेतकर्यांना करावा लागला. जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने सुरुवातीला भात शेतीचे नुकसान झाले होते. त्यातून सावरलेल्या शेतकर्यांनी आपल्या मेहनतीने शेती पिकवली. त्यातून फुललेली शेती आता कुठे कापण्यायोग्य झाली असतानाच मागील काही दिवसांपासून जिल्हाभरात परतीच्या पावसाच्या सरी बरसत आहेत. शेतकर्यांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे. यंदा पावसाने उत्तम साथ दिल्याने भाताचे पीक जोमदार आले आहे. पिकाच्या गरजेनुसार झालेल्या पावसामुळे सप्टेंबरच्या अखेरच्या आठवडयातच हळवी पिके कापणी योग्य झाली. मात्र पितृपक्ष असल्याने शेतकर्यांनी कापणी सुरू केली नाही. नवरात्र सुरू होताच काही शेतकर्यांनी कापणीला सुरुवात केली. मात्र मागील दहा दिवसांपासून बरसणार्या पावसाने शेतकर्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. कापणीच्या कामाला वेग आला नसला तरी शेतकरी वेळ आणि मजूर मिळतील त्यानुसार भातकापणी करीत आहेत. मात्र संध्याकाळच्या सुमारास विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह बरसणार्या पावसाची धास्ती शेतकर्यांना वाटत आहे. त्यामुळे शेतकरी पाऊस थांबण्याच्या प्रतीक्षेत आहेत. परतीच्या पावसामुळे कापणी योग्य झालेले भातपीक शेतात साठलेल्या पाण्यात आडवे झाले आहे. यामुळे भात पिकाला पुन्हा कोंब येण्याची शक्यता आहे. दरवर्षी भात लागवड करायची आणि शेवटच्या क्षणाला भातशेतीचे प्रचंड नुकसान यामुळे मातीत टाकलेला पैसा धान्याच्या माध्यमातून मिळत नसल्यामुळे शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.
पेण तालुक्यात परतीच्या पावसाने गेले आठवडाभर धुमाकूळ घातला आहे. दररोज दुपारनंतर प्रचंड मोठया प्रमाणात विजांच्या कडकडाटासह पाउस पडत असून तयार झालेल्या भातशेतीचे मात्र अतोनात नुकसान झालेले पाहून आता शेतकर्यांच्या डोळ्यात पाणी येऊ लागले आहे. अगदी शेवटच्या क्षणी भातपीक घरी घेऊन येण्याच्या वेळी पावसाने मात्र भातशेतीला बुडवून ठेवले आहे.
दररोज परतीचा पाऊस सायंकाळी चार वाजल्यानंतर धो-धो बरसतो आहे. खरीप हंगाम सरत असताना परिपक्व तयार भातशेती पावसाने झोडपून जमीनदोस्त केली आहे. पेणमधील किमान पाच ते सहा हजार हेक्टर क्षेत्रावर ही परतीचा पाउस शेतक-यांच्या जिवावर उठला असून शिवारात जे समृध्दीचे दान निपजले होते ते या परतीच्या पावसाने उध्वस्त केले आहे.
पेण तालुक्यात तब्बल 12 हजार 800 हेक्टरावर भातपीकाची लागवड केलेली आहे. खरीप हंगाम सरता सरता पावसाची शेवटची नक्षत्रे हस्त आणि चित्रा या नक्षत्रात पावसाने धुमाकूळ घातल्याने शेतकरी आता हताश झाला आहे. शेतक-यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी तलाठी मंडळ अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांनी शेताच्या बांधावर जाऊन किमान पहाणी दौरा करणे सध्या अपेक्षीत ठरेल ती अपेक्षा शेतकरी करताहेत.