श्रीवर्धन : भारत चोगले
मासिक पाळीच्या काळात स्वच्छतेची योग्य काळजी न घेतल्यास गंभीर आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. या काळात मुलींना आणि महिलांना शरीरातील बदल, मानसिक ताण, अभ्यासाचा दबाव आणि जीवनशैलीमुळे स्वतःची काळजी घेण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही. यावर सखोल मार्गदर्शन देण्यासाठी निर्णय फाऊंडेशनच्या संगीता बालोदे यांच्याकडून उपक्रम राबविण्यात आला.
तुम्ही जाणता की, मासिक पाळी व्यवस्थापन आणि स्वच्छता या दोन गोष्टी किशोरी वयातील मुलींना त्यांच्या शारीरिक बदलांसाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात. जुन्या रुढी आणि परंपरेवर आधारित विचारांऐवजी, आधुनिक वैज्ञानिक दृष्टिकोनातून या समस्यांचा सामना करणे गरजेचे आहे. यासाठी किशोरी मुलींना पौष्टिक आहार, योग्य पाणी पिण्याचे प्रमाण आणि स्वच्छता राखण्याबाबत योग्य मार्गदर्शन मिळविणे आवश्यक आहे.
दिघी गावातील कोळीवाडा येथील किशोरी मुलींना या बाबतीत विशेष प्रशिक्षण देण्यात आले. मासिक पाळी दरम्यान स्वच्छता राखली नाही, तर जंतू संसर्ग, खाज सुटणे, इत्यादी समस्या निर्माण होऊ शकतात. मात्र, योग्य स्वच्छता आणि काळजी घेतल्यास, योनीमार्ग, मूत्र मार्गातील संसर्ग, यीस्ट संसर्ग टाळता येऊ शकतात, ज्यामुळे मुलींना आरोग्याच्या धोक्यापासून संरक्षण मिळू शकते. कार्यक्रमाचे आयोजन दिघी अब्दुल सत्तार इस्माईल अंतुले शाळा, पी. एन. पी. हायस्कूल वडवली, रायगड जिल्हा परिषद मराठी शाळा वडवली आणि द. ग. तटकरे हायस्कूल विरझोली येथे करण्यात आले. या कार्यक्रमात एकूण 402 मुलींनी सहभाग घेतला आणि मासिक पाळी व्यवस्थापनावर मार्गदर्शन करण्यात आले.
याप्रसंगी रा.जि.प. मराठी शाळेच्या मुख्याध्यापिका पूजा मुरकर, पी. एन. पी. हायस्कूल वडवली शिक्षिका नितिशा मोकल, सुवर्णा डोळस, वडवली आगरी समाज महिला उपाध्यक्षा उज्वला बिराडी, विरझोली शाळेचे मुख्याध्यापक मार्गे आणि अन्य शिक्षिका उपस्थित होत्या. याशिवाय, अदाणी फाऊंडेशनच्या जयश्री काळे यांनी पोषण आणि आरोग्यविषयक उपक्रमांची माहिती दिली. अदाणी फाऊंडेशनच्या सामाजिक उपक्रमांमुळे, परिसरातील आरोग्यविषयक जनजागृती वाढत असून भविष्यात अशा कार्यक्रमांची संख्या अधिक वाढवण्याची योजना आहे. ग्राम सखी नम्रता दिघीकर आणि अरुंधती पिळणकर यांनी या उपक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले.