Raigad Power Supply Pudhari
रायगड

Alibaug Power Supply: अलिबागमध्ये ९९ टक्के वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश; अतिवृष्टीत महावितरणचे मोठे नुकसान

जीवाची पर्वा न करता कर्मचाऱ्यांकडून वाहिन्यांची जोडणी

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग: रायगड जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी आणि वादळी वाऱ्यामुळे महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेला मोठा फटका बसला. अलिबाग तालुक्यातील उसर उपकेंद्राअंतर्गत वावेसह परिसरातील अनेक गावांमध्ये वीज खांब, रोहित्रे आणि वीजवाहिन्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने संपूर्ण परिसर काही काळ अंधारात बुडाला होता.

मात्र, प्रतिकूल हवामानाची पर्वा न करता महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे हाती घेत ९९ टक्के वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश मिळवले आहे.

हवामान विभागाने ४ ते ६ जुलैदरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिल्यानुसार जिल्ह्यात मुसळधार पाऊस आणि वादळी वारे वाहिले. या वादळामुळे वावे परिसरातील अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली. त्याखाली वीजवाहिन्या तुटल्या, तर अनेक लघु व उच्चदाब वीजवाहिन्यांचे खांब कोसळले किंवा झुकले. त्यामुळे अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला.

या आपत्तीत सुमारे २० वीज खांब, २ रोहित्रे, १५ ठिकाणी वीजवाहिन्या आणि ७ खांबांचे नुकसान झाले. सुरक्षिततेच्या दृष्टीने संबंधित रोहित्रे तात्पुरती बंद करण्यात आल्याने अनेक गावे आणि वाड्या अंधारात होत्या.

फणसापूर शाखेचे कनिष्ठ अभियंता विश्वजीत महाल यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या पथकाने भर पावसात आणि पाणी साचलेल्या परिसरातही दुरुस्तीचे काम सुरू ठेवले. रात्रीचा दिवस करून कोसळलेले खांब उभे करणे, तुटलेल्या तारा जोडणे आणि वीजवाहिन्या पूर्ववत करण्याचे काम करण्यात आले.

या अथक प्रयत्नांमुळे बहुतांश भागातील वीजपुरवठा सुरळीत झाला असून, झुकलेले खांब सरळ करणे आणि उर्वरित दुरुस्तीची कामे सुरू असल्याची माहिती महावितरणकडून देण्यात आली. उर्वरित भागात वीजेची कामे सुरू आहेत.

उर्वरित कामेही वेगाने सुरू

मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे वीज वितरण यंत्रणेचे मोठे नुकसान झाले. मात्र, नागरिकांना शक्य तितक्या लवकर वीजपुरवठा सुरू करण्यासाठी अधिकारी व कर्मचारी जीवाची पर्वा न करता सातत्याने काम करत आहेत. आतापर्यंत ९९ टक्के वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला असून उर्वरित कामेही वेगाने सुरू आहेत, अशी माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT