Raigad Drushti WhatsApp chatbot pudhari photo
रायगड

Raigad Drushti WhatsApp chatbot : रायगडमध्ये चॅटबॉटद्वारे संशयास्पद हालचालींवर लक्ष

पोलिसांना मिळते थेट माहिती; 'रायगड दृष्टी' व्हॉट्सॲॅप चॅटबॉट अभिनव उपक्रम

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : रमेश कांबळे

रायगड जिल्हा गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी नागरिकांच्या सक्रिय सहभागाला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने रायगड पोलिसांनी 'रायगड दृष्टी' व्हॉट्सअॅप चॅटबॉट हा अभिनव उपक्रम मागील वर्षभरापासून सुरू केला आहे. या माध्यमातून नागरिकांना त्यांच्या आजूबाजूच्या परिसरात घडणाऱ्या कोणत्याही समाजविघातक कृत्याची, संशयास्पद हालचालींची किंवा कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या प्रकारांची माहिती थेट पोलिसांपर्यंत पोहोचविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

या चॅटबॉटच्या माध्यमातून अवैध धंदे, अंमली पदार्थांची विक्री, जुगार, मटका, अवैध दारू व्यवसाय, चोरी, संशयास्पद व्यक्तींची वर्दळ, शस्त्रांचा बेकायदेशीर वापर तसेच इतर कोणत्याही समाजविघातक कृत्यांची माहिती नागरिक सहजपणे देऊ शकतात. नागरिकांनी पाठविलेल्या माहितीची पडताळणी करून संबंधित पोलिस ठाण्यांमार्फत आवश्यक ती कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिस अधिक्षक आँचल दलाल यांनी स्पष्ट केले आहे.

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे माहिती देणाऱ्या तक्रारदाराची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या भीतीशिवाय नागरिकांनी पुढे येऊन समाजविघातक प्रवृत्तींविरोधात पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

पोलिस आणि नागरिक यांच्यातील समन्वय अधिक प्रभावी करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करण्यावर रायगड पोलिसांनी भर दिला आहे. नागरिकांकडून वेळेवर मिळणारी माहिती अनेक गुन्हे रोखण्यासाठी तसेच गुन्हेगारांवर तातडीने कारवाई करण्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाने जबाबदार नागरिक म्हणून आपल्या परिसरातील संशयास्पद घडामोडींवर लक्ष ठेवून त्या तात्काळ 'रायगड दृष्टी' व्हॉट्सअॅप चॅटबॉटच्या माध्यमातून पोलिसांना कळवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

या उपक्रमामुळे पोलिसांना स्थानिक पातळीवर अधिक अचूक माहिती मिळण्यास मदत होणार असून, गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण ठेवणे, कायदा व सुव्यवस्था अधिक सक्षम करणे आणि नागरिकांच्या सहकार्याने सुरक्षित, निर्भय व गुन्हेमुक्त रायगड घडविण्याच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे.

'रायगड दृष्टी' व्हॉट्सअॅप चॅटबॉटच्या माध्यमातून नागरिकांनी त्यांच्या परिसरातील कोणतीही संशयास्पद किंवा समाजविघातक माहिती निर्धास्तपणे आम्हाला द्यावी. माहिती देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची ओळख पूर्णपणे गोपनीय ठेवली जाईल. प्राप्त होणाऱ्या माहितीवर तातडीने पडताळणी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सुरक्षित, शांततामय आणि गुन्हेमुक्त रायगड घडविण्यासाठी नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सक्रिय सहकार्य करावे.
आँचल दलाल, जिल्हा पोलिस अधीक्षक

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT