Raigad Mobile Tower Theft Gang pudhari photo
रायगड

Raigad Crime : रायगडच्या दुर्गम भागातील मोबाईल टॉवर्स लुटणाऱ्या हायटेक टोळीचा पर्दाफाश

माेबाईलचे मध्यरात्री ‘सिग्नल्स’ गायब!

पुढारी वृत्तसेवा

जयंत धुळप, अलिबाग

मध्यरात्री अचानक मोबाईलचा सिग्नल पूर्णपणे गायब व्हायचा. एक-दोन तास नव्हे, तर कित्येक तास इंटरनेट, मेसेज आणि कॉल सेवा ठप्प व्हायच्या. सुरुवातीला हा निव्वळ तांत्रिक बिघाड वाटत होता; परंतु लागोपाठ घडणाऱ्या या प्रकारांमागे एक अट्टल आणि हायटेक गुन्हेगारी टोळी सक्रिय असल्याचे स्पष्ट झाले. रायगड जिल्ह्यातील कर्जत, नेरळ, पेण आणि महामार्गालगतच्या परिसरातील निर्जन मोबाईल टॉवर्सचे दरवाजे तोडून महागड्या लिथियम बॅटऱ्या, कॉपर केबल्स आणि नेटवर्कची महागडी इलेक्ट्रॉनिक उपकरणे पळवणाऱ्या एका मोठ्या आंतरजिल्हा टोळीचा रायगड पोलिसांनी अखेर थरारक पाठलाग करत पर्दाफाश केला आहे.

दिवसा गुप्त रेकी आणि मध्यरात्री १५ मिनिटांत दरोडा

या टोळीची कार्यपद्धती अत्यंत नियोजनबद्ध आणि चलाख होती. टोळीतील सदस्य दिवसा वेगवेगळ्या भागांत फिरून अशा मोबाईल टॉवर्सची रेकी करायचे, जिथे रात्रीच्या वेळी कोणताही सुरक्षा रक्षक तैनात नसायचा. त्यानंतर मध्यरात्री २ ते पहाटे ४ वाजण्याच्या सुमारास, जेव्हा संपूर्ण परिसर गाढ झोपेत असायचा, तेव्हा पिकअप व्हॅन किंवा चारचाकी गाडी घेऊन हे चोरटे घटनास्थळी पोहोचायचे. अवघ्या १५ ते २० मिनिटांत कटरच्या साहाय्याने सर्व्हर रूमचे भक्कम कुलूप कापून आत शिरणे, लाखोंच्या बॅटऱ्या गाडीत भरणे आणि अंधाराचा फायदा घेत पसार होणे, यात ही टोळी कमालीची पटाईत झाली होती.

पोलिसांसमोर मोठे आव्हान आणि थरारक सापळा

एकापाठोपाठ एक १० हून अधिक चोऱ्या रायगड जिल्ह्यात झाल्यानंतर मोबाईल कंपन्यांचे धाबे दणाणले होते. या चोऱ्यांमुळे हजारो ग्राहकांचा संपर्क तुटून सेवा खंडित होत असल्याने पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते. रायगड पोलीस अधीक्षक आंचल दलाल व स्थानिक गुन्हे शाखेच्या मार्गदर्शनाखाली नेरळ व कर्जत पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. घटनास्थळांवरील अत्यंत तुटपुंजे धागेदोरे, संशयास्पद वाहनांचे फुटेज, टॉवर लोकेशनचा सखोल अभ्यास आणि गुप्त बातमीदारांचे जाळे याच्या आधारे पोलिसांनी महामार्गालगत रात्रभर पाळत ठेवून सापळा रचून टोळीच्या मुसक्या आवळल्या.

५६ लाखांचा मुद्देमाल जप्त आणि ११ जण गजाआड

रायगड पोलिसांनी टोळीतील ११ आरोपींना गजाआड केले आहे. चोरट्यांच्या ताब्यातून व त्यांनी मुंबई, ठाणे व नवी मुंबईतील भंगार माफियांना विकलेल्या साठ्यातून लिथियम-आयन बॅटऱ्या, कॉपर केबल्स, गुन्ह्यात वापरलेली वाहने असा ५६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांनी वेळेत ही कारवाई केल्यामुळे जिल्ह्यातील मोबाईल टॉवर चोरीचे एक मोठे रॅकेट उद्ध्वस्त झाले असून, आता कंपन्यांनाही आपल्या टॉवर परिसरातील सुरक्षारक्षक, सीसीटीव्ही व अत्याधुनिक अलार्म यंत्रणा अधिक मजबूत करण्याचे कडक निर्देश रायगड पाेलिसांकडून देण्यात आले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT