Poladpur Heavy Rain
पोलादपूर : पोलादपूर तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध ठिकाणी नुकसानाच्या घटना घडत आहेत. शनिवारी (दि.४) वडघर येथील सोनारवाडीमध्ये दरड कोसळल्याने सात नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले, तर धामणदेवी येथे अतिवृष्टीमुळे वडाचे झाड कोसळून सभामंडपाचे नुकसान झाले.
आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, वडघर येथील सोनारवाडीत दरड कोसळल्याने संभाव्य धोका लक्षात घेऊन तेथील रहिवाशांना तातडीने सुरक्षितस्थळी हलविण्यात आले. गणपत महादेव कराडकर, रामचंद्र तुकाराम कराडकर, अनिल रामचंद्र कराडकर, हरी बंडू पाटणकर, लक्ष्मीबाई गणपत कराडकर, जयश्री रामचंद्र कराडकर आणि पार्वती मारुती पंडित अशा सात जणांना वडघर येथील अंगणवाडीत तात्पुरता निवारा देण्यात आला. स्थलांतरितांमध्ये चार पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे.
दरम्यान, धामणदेवी येथे अतिवृष्टीमुळे मोठे वडाचे झाड कोसळून गावातील सभामंडपाचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
तालुक्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू असून अनेक ठिकाणी अधूनमधून जोरदार सरी कोसळत आहेत. या कालावधीत दोन वेळा १०० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद झाली असून प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.