धनराज गोपाळ
पोलादपूर: तालुक्यात गेल्या २४ तासात १५८ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, एकूण पाऊस ४०६४ इतका झाला आहे. पोलादपूरसह महाबळेश्वर घाटमाथ्यावर धुवाधार कोसळलेल्या पावसाने सावित्री नदीच्या पाणीपात्रात वाढ होऊन पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, पुराचे पाणी रस्त्यावर आले आहे.
अचानक झालेल्या पावसाने नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला. त्यातच रात्री १० च्या सुमारास सवाद गावात पाणी शिरू लागल्याने प्रशासनाची धावपळ उडाल्याचे पाहायला मिळाले. सावित्री नदी तुडुंब भरून वाहत असल्याने प्रशासनाकडून परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
महाबळेश्वर, पोलादपूर आणि आंबेनळी घाट, कशेडी घाट परिसरात दिवसभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे सावित्री नदी तुडुंब भरून वाहत आहे. सततच्या पावसामुळे नदीची पाणी पातळी झपाट्याने वाढत असून, परिसरातील गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
प्रशासनाकडून परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापन, पोलीस, आरोग्य आणि महसूल विभागाच्या यंत्रणा सज्ज ठेवण्यात आल्या असून, संभाव्य आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सर्व आवश्यक तयारी करण्यात आली आहे.
प्रशासनाने नागरिकांना नदीकाठी जाणे टाळण्याचे आवाहन केले असून, स्थानिकांना सतत संपर्कात राहण्यास सांगितले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील काही तासांतही पावसाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे. असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. धुवाधार कोसळलेल्या पावसामुळे कापडे गावाजवळ पोलादपूर महाबळेश्वर रस्त्यावर दगड मातीचा ओसारा आल्याने प्रशासनाकडून तात्काळ रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्याचे काम करण्यात आले.