एचएसआरपी नंबर प्लेट बसविण्याकरिता 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत pudhari photo
रायगड

HSRP Number Plate | रायगड जिल्ह्यात एचएसआरपी नंबरप्लेट नसल्यास वाहनधारकांवर दंडात्मक कारवाई

पनवेलसह उरण, कर्जत, खालापुरात ३० नोव्हेंबरपर्यंत विशेष तपासणी मोहीम; आरटीओ आणि वाहतूक पोलिसांची संयुक्त पथके रस्त्यावर

पुढारी वृत्तसेवा

Panvel RTO Action

पनवेल : वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकपट्टी (एचएसआरपी) बसविणे बंधनकारक असतानाही अद्याप नंबरप्लेट न बसविलेल्या वाहनधारकांविरोधात पनवेल प्रादेशिक परिवहन कार्यालयाने विशेष तपासणी मोहीम सुरू केली आहे. २० ते ३० नोव्हेंबरदरम्यान राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत एचएसआरपी नसलेल्या वाहनांवर थेट दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे पनवेल, उरण, कर्जत आणि खालापूर परिसरातील वाहनधारकांनी तातडीने नंबरप्लेट बसवून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

परिवहन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या १७ नोव्हेंबर रोजी झालेल्या आढावा बैठकीतील निर्देश आणि परिवहन आयुक्तांनी १९ नोव्हेंबर रोजी दिलेल्या आदेशानुसार ही मोहीम राबविली जात आहे. कारवाईसाठी पनवेल आरटीओच्या वायुवेग पथकांसह स्थानिक वाहतूक पोलिसांची संयुक्त पथके तैनात करण्यात आली आहेत. शहरातील प्रमुख रस्ते, महामार्ग, तपासणी नाके आणि गर्दीच्या ठिकाणी वाहनांची तपासणी सुरू आहे.

दुचाकी, तीनचाकी, चारचाकी तसेच प्रवासी आणि मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करून एचएसआरपी बसविण्यात आली आहे की नाही, याची खातरजमा केली जात आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंड आकारण्यात येणार आहे.

ऑनलाइन नोंदणीची सुविधा

एचएसआरपी बसविण्यासाठी वाहनधारकांना ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. वाहनधारकांनी https://mhhsrp.com या अधिकृत संकेतस्थळावर नोंदणी करून जवळच्या फिटमेंट सेंटरमध्ये नंबरप्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन आरटीओ प्रशासनाने केले आहे.

पनवेल परिसरात २२ फिटमेंट सेंटर

पनवेल आरटीओ कार्यक्षेत्रात पनवेल, कळंबोली, खारघर, उलवे, तळोजा, खोपोली, कर्जत, उरण आणि वडखळ परिसरात २२ अधिकृत फिटमेंट सेंटर उपलब्ध आहेत. त्यामुळे वाहनधारकांना जवळच्या केंद्रावर जाऊन एचएसआरपी बसवून घेता येणार आहे. ३० नोव्हेंबरपूर्वी ही प्रक्रिया पूर्ण न केल्यास तपासणीदरम्यान दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT