Crime News  Pudhari
रायगड

Panvel Crime | कळंबोलीत मध्यरात्री थरार: फोनवर इतर व्यक्तीशी बोलण्याच्या संशयातून पत्नीची हत्या; पतीला अटक

अनैतिक संबंधांच्या संशयावरून पत्नीला मारहाण

पुढारी वृत्तसेवा

Kalamboli Crime News

पनवेल : पत्नी इतर व्यक्तींशी फोनवर बोलत असल्याने आणि तिचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन पतीने केलेल्या मारहाणीत तिचा मृत्यू झाल्याची घटना कळंबोलीत घडली. पिंकी मोनीश गोप ऊर्फ सोनिया मोहम्मद अबू खातून असे मृत महिलेचे नाव आहे. या प्रकरणी कळंबोली पोलिसांनी पती मोनीश रणजीत गोप (वय २७) याला अटक केली आहे.

मोनीश हा डिलिव्हरी बॉय म्हणून काम करत असून, तो पत्नी पिंकीसोबत कळंबोलीतील सेक्टर ४ ई येथील जे. बी. कॉम्प्लेक्समध्ये राहत होता. पिंकी इतर व्यक्तींशी फोनवर बोलत असल्याने तिचे बाहेरील व्यक्तींशी अनैतिक संबंध असल्याचा संशय मोनीशला होता. याशिवाय, पिंकीच्या गुगल पे खात्यावर अन्य व्यक्तीच्या बँक खात्यातून पैसे जमा झाल्याचेही त्याच्या निदर्शनास आले होते. या कारणांवरून दोघांमध्ये वारंवार वाद होत असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, १५ ऑक्टोबर रोजी मध्यरात्री सुमारे दोनच्या सुमारास दोघांमधील वाद विकोपाला गेला. यावेळी संतप्त झालेल्या मोनीशने पिंकीच्या चेहऱ्यावर, मानेवर आणि छातीवर बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच, तिला ओरबाडून पोटावर हातापायांनी मारहाण केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पिंकीचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, कळंबोली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच अन्य पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून आरोपी मोनीश गोप याला अटक केली. या प्रकरणाचा पुढील तपास कळंबोली पोलीस करीत आहेत.

दरम्यान, मृत महिला बांगलादेशी असल्याची माहितीही समोर आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT