Raigad NHM Employees Pending Wages Pudhari
रायगड

Raigad NHM Salary Delay | घरखर्च, कर्जहप्ते अन् चिंता; वेतनाअभावी 'एनएचएम' कर्मचाऱ्यांचे गणित बिघडले; आरोग्य सेवा देणारेच आर्थिक अडचणीत

रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मागील काही महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही

पुढारी वृत्तसेवा

Raigad NHM Employees Pending Wages

अलिबाग : रायगड जिल्ह्यात राष्ट्रीय आरोग्य अभियान (एनएचएम) अंतर्गत कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांना मागील काही महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याने त्यांच्यावर आर्थिक संकटाचे ढग गडद झाले आहेत. आरोग्य व्यवस्थेतील महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे कर्मचारीच आता आर्थिक अडचणीत सापडल्याचे चित्र दिसत आहे. तिसरा महिना संपत आला असतानाही वेतन न झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये अस्वस्थता आणि नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वेतनाअभावी अनेक कर्मचाऱ्यांचे मासिक आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. घरखर्च, मुलांच्या शिक्षणाचा खर्च, बँकेच्या कर्जाचे हप्ते, वीजबिले तसेच इतर दैनंदिन खर्च भागवताना कर्मचाऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही कर्मचाऱ्यांवर गरज भागवण्यासाठी मित्र, नातेवाईक किंवा इतरांकडून आर्थिक मदत घेण्याची वेळ आल्याचेही समोर येत आहे.

राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत कार्यरत कर्मचारी ग्रामीण आणि शहरी भागातील आरोग्य सेवा सुरळीत ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आरोग्य विभागातील विविध योजनांची अंमलबजावणी, नागरिकांना सेवा उपलब्ध करून देणे तसेच वैद्यकीय कामकाजात सातत्य ठेवण्याचे काम हे कर्मचारी करत असतात. मात्र सेवा देत असतानाच स्वतःच्या आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने त्यांच्यामध्ये नाराजी वाढत आहे.

दरम्यान, या संदर्भात राष्ट्रीय आरोग्य अभियानचे जिल्हा लेखा व्यवस्थापक संतोष पाटील यांनी माहिती देताना सांगितले की, काही तांत्रिक कारणांमुळे तसेच वेतन प्रक्रियेसाठी नवीन प्रणाली लागू करण्यात आल्यामुळे वेतन वितरणात विलंब झाला आहे.

त्यांनी पुढे स्पष्ट केले की, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे प्रलंबित वेतन येत्या सोमवारपर्यंत करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अनेक दिवसांपासून आर्थिक अडचणीत असलेल्या कर्मचाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र वेतन वितरण प्रक्रिया नियमित आणि वेळेत होणे आवश्यक असल्याची भावना कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT