खोपोली : प्रशांत गोपाळे
येथील पारले कंपनीत 13 मार्च रोजी सुरेंद्र गायकर (53) यांचा पहिल्या पाळीत कामावर ड्युटी बजावत असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. कंपनी व्यवस्थापकांनी मानसिक त्रास दिल्यामुळे मृत्यु झाल्याचा आरोप कामगार आणि कुटूंबियांनी करीत मृतदेह ताब्यात घेण्यास विरोध केल्यामुळे 8 ते 9 तास मृतदेह रूग्णालयात ठेवण्यात आल्याने तणावाचा वातावरण होते.
कंपनी व्यवस्थापकांनी नुकसान भरपाई जाहीर केल्यानंतर मृतदेह ताब्यात घेतला आणि रात्रीच्या वेळी जांबरूग येथे अंत्यसंस्कार करण्यात आलेे. होळी सणाच्या दिवशी जांबरूग गावावर दुख:चा डोंगर कोसळला आहे. खालापूर तालुक्यातील तांबाटी ग्रामपंचायत हाद्दीत बिस्कीट उत्पादन करणारी पारले कंपनी आहे. वर्षभरापासून कंपनी आर्थिक अडचणीत असल्याने उत्पादन बंद केले असून सध्या कामगार पडेल ते काम करीत आहेत. कामगारांनी स्वच्छेने राजिनामा देण्यासाठी कामगारांना मानसिक त्रास दिले जात असल्याचा आरोप कामगार करीत आहेत तशा तक्रारी खालापूर पोलिस ठाण्यात केल्या असल्याचे कामगार सांगत आहेत.
सुरेंद्र हरी गायकर हे होळी सणाच्या दिवशी दिवसपाळीला कामावर आले होते. कामावर असताना व्यवस्थापकांनी मानसिक त्रास दिला होता असे सहकारी कामगारांनी सांगितले. दुपारी जेवणाच्या सुट्टीत सुरेंद्र गायकर शौचालयात गेले असता तेथेच चक्कर येवून पडले. त्यानंतर उपचारार्थ त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये घेवून गेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. ही बातमी सर्वत्र पसरताच कामगार आणि गायकर यांचे कुटूंब रूग्णालयात पोहचले व मानसिक त्रास देणार्या कंपनी व्यवस्थापकांवर गुन्हा दाखल करा तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा उद्रेक करताच वातावरण तापले होते. त्यानंतर खालापूर पोलिस ठाण्यात सुरेंद्र गायकर यांच्या मुलीने खालापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे व कंपनी व्यवस्थापक वारंवार मानसिक त्रास देत असल्यामुळे वडील घरी आल्यावर रडायचे असे तक्रारीत म्हटले होते. याबाबत कंपनी अधिकार्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.