अलिबाग : नागपूर येथे पार पडलेल्या शपथविधी सोहळ्या आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांना कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ देण्यात आली. यामुळे रायगडच्या विकासाला आता मोठी चालना मिळणार आहे. जिल्ह्याच्या इतिहासात रायगडला प्रथमच दोन कॅबिनेट मंत्रीपदे मिळाली आहेत. तीन आमदार असूनही या पहिल्या विस्तारात भाजपला मंत्रीपद मिळालेले नाही.यामुळे भाजपमधून नाराजी व्यक्त होत आहे.
आदिती तटकरे या सन 2019 मध्ये प्रथम श्रीवर्धन मतदार संघातून विधानसभेवर महाआघाडीतर्फे विजयी झालेल्या होत्या.तत्कालीन उद्धव ठाकरे मंत्रिमंडळात त्या राज्यमंत्री म्हणून कार्यरत होत्या.शिवाय जिल्ह्याचे पालकमंत्रीपदही त्यांना मिळालेले होते.त्यांच्या पालकमंत्रीपदाला रायगडातील एकसंघ शिवसेनेचे आ. भरत गोगावले,आम. महेंद्र दळवी,आम.महेंद्र थोरवे यांनी विरोध दर्शविला होता.त्यानंतर राज्यात सत्तांतर झाले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आमदारांनी बंड करुन भाजपशी युती करीत सत्ता स्थापन केली होती.या सरकारात वर्षभराने अजित पवारही सहभागी झाले.त्यामुळे त्यांच्या कट्टर समर्थक आदिती तटकरे यांना कॅबिनेट मंत्री करण्यात आले.आता सुद्धा त्यांना पुन्हा मंत्री करण्यात आले आहे.सलग दोन वेळा मंत्री होण्याचा बहुमान त्यांना मिळाला.
गेले अडीच वर्षे मी मंत्रीपदाची शपथ घेणारच असा निर्धार व्यक्त करणार्या शिवसेनेचे महाडचे आ.भरत गोगावले यांचा प्रथमच राज्यमंत्रीमंडळात कॅबिनेट मंत्री म्हणून समावेश करण्यात आला आहे.रविवारी त्यांनी नवीन जॅकेट परिधान करुन पद आणि गोपनियतेची शपथ घेतली.त्यांच्या रुपाने महाडला दुसर्यांचा मंत्रीपदाचा मान मिळाला आहे.यापूर्वी सन 1995 मध्ये तत्कालीन युती सरकारच्या काळात शिवसेनेच प्रभाकर मोरे हे सलग पाच वर्षे राज्यमंत्री,कॅबिनेट मंत्री,पालकमंत्री म्हणून कार्यरत होते.गोगावले हे सलग चारवेळा महाडमधून विधानसभेवर विक्रमी मताधिक्यांनी निवडूण आलेले आहेत.
गोगावले,तटकरे यांच्या रुपाने रायगडला प्रथमच दोन कॅबिनेट मंत्री प्राप्त झालेले आहेत.आतापर्यंत जिल्ह्यातून दत्ता खानविलकर, अ.र.अंतुले,रविंद्र राऊत, बी.एल.पाटील, प्रभाकर धारकर, प्रभाकर मोरे, सुनील तटकरे, मोहन पाटील, मीनाक्षी पाटील, आदिती तटकरे यांनी मंत्रीपदे भूषविली आहेत.सन 1999 मध्ये तत्कालीन विलासराव देशमुख सरकारात सुनील तटकरे,मोहन पाटील,मीनाक्षी पाटील हे तिघेजण राज्यमंत्री म्हणून कार्यरत होत्या.त्यानंतर सुनील तटकरे हे कॅबिनेट मंत्री झाले.त्यानंतर आदिती तटकरेच मंत्री झाल्या.