जेएनपीए | ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व असलेल्या द्रोणागिरी पर्वत परिसरातून जाणार्या सागरी सेतू मार्गामुळे अस्तित्व धोक्यात आले आहे. या महत्वाच्या वास्तुंचे अस्तित्व कायम रहावे ही ग्रामस्थांची भूमिका आहे. त्यामुळे करंजा ग्रामस्थांनी द्रोणागिरी पर्वत परिसरातून जाणार्या सागरी सेतू मार्गाला कडाडून विरोध दर्शविण्यात आला.
रेवस ते रेड्डी सागरी महामार्गावरील करंजा ते रेवस सागरी सेतुच्या जागेच्या मोजणी संदर्भात पवन चांडक-उपविभागीय अधिकारी पनवेल यांच्या उपस्थितीत तहसिल ऑफिस उरण येथे 7 जानेवारी रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला प्रांत अधिकारी पवन चांडक, एमएसआरडीसीचे बोराडे, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून नरेश पवार, चाणजे ग्रामपंचायत सरपंच अजय म्हात्रे, माजी सभापती अॅड. सागर कडू, माजी जिल्हा परिषद सदस्य सिताराम नाखवा, करंजा ग्रामस्थ मंडळ अध्यक्ष कल्पेश थळी, उपाध्यक्ष देवीदास थळी, मेघनाथ थळी मुळेखंड, कोंढरी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष आणि ग्रामस्थ उपस्थित होते. सदर बैठकीत ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व असलेल्या द्रोणागिरी पर्वत परिसरातून जाणार्या मार्गाला ग्रामस्थांकडून कडाडून विरोध दर्शविण्यात आला.
उरण तालुक्यातील करंजा येथे समुद्रकिनारी द्रोणागिरी पर्वत वसलेला असून या द्रोणागिरी पर्वताला धार्मिक, पौराणिक, ऐतिहासिक महत्व आहे. द्रोणागिरी किल्ला, डोंगरावरील द्रोणागिरी मातेचे मंदिर हे ऐतिहासिक वारसा आहेत.
करंजा-रेवस सागरी सेतुला तमाम उरण आणि करंजा गावातील जनतेचा पाठिंबा आहे. परंतु ऐतिहासिक आणि पौराणिक महत्व प्राप्त असलेल्या द्रोणागिरी पर्वताला धक्का न लावता हा मार्ग करण्यात यावा ही महाराष्ट्र शासनाला विनंती आहे.सचिन रमेश डाऊर, सामाजिक कार्यकर्ता, उरण.