Raigad News 
रायगड

Raigad News : नागावमध्ये रस्त्यावरील मातीचा ढिगारा ठरला मृत्यूचा सापळा; ठेकेदारासह इंजिनियरवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा!

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : नागाव-रेवदंडा रस्त्यावरील सिमेंट काँक्रिटीकरणाच्या कामातील निष्काळजीपणा एका दुचाकीस्वाराच्या जीवावर बेतल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. रस्त्याच्या मध्यभागी ठेवण्यात आलेला मातीचा ढिगारा, त्याठिकाणी कोणतेही सुरक्षा बॅरिकेड्स, ब्लिंकर किंवा धोक्याचे सूचना फलक नसल्याने झालेल्या अपघातात बोरपाडा येथील प्रकाश काशिनाथ भगत (वय ५४) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी अलिबाग पोलिसांनी रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीच्या ठेकेदारासह इंजिनियर आणि कामावर देखरेख करणाऱ्या कंपनीच्या टीम लिडरविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागाव ते रेवदंडा रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम आरपीपी इन्फ्रा प्रोजेक्ट लिमिटेड या कंपनीमार्फत सुरू आहे. नागाव येथील खारगल्ली बसथांब्याजवळ रस्त्याच्या दोन्ही बाजूंचे काँक्रिटीकरण पूर्ण झाले होते. मात्र, रस्त्याच्या मध्यभागी खड्डा खोदून त्यातून निघालेला मातीचा ढिगारा रस्त्यावरच ठेवण्यात आला होता. विशेष म्हणजे, या ठिकाणी ब्लिंकर, बॅरिकेड्स, धोक्याचे सूचना फलक, काम सुरू असल्याचे दर्शविणारे बोर्ड किंवा सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले नव्हते.

१९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी सुमारे ७.१५ वाजण्याच्या सुमारास प्रकाश भगत हे आपल्या एमएच ०६ बीओ २३९४ क्रमांकाच्या दुचाकीवरून रेवदंडा बाजूकडून नागावच्या दिशेने जात होते. अंधारामुळे रस्त्यावरील मातीचा ढिगारा त्यांच्या निदर्शनास आला नाही. त्यामुळे त्यांची दुचाकी ढिगाऱ्यावरून उडून खड्ड्यात पडली. या भीषण अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली आणि त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणात रस्त्याचे काम करणाऱ्या कंपनीचा ठेकेदार जगदिस्वरण राजू (वय ४२) आणि इंजिनियर प्रेमचंद मुरली (वय ३०) यांनी आवश्यक सुरक्षा उपाययोजना न केल्याचा आरोप आहे. तसेच या कामावर देखरेख करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाने नियुक्त केलेल्या सल्लागार कंपनीच्या टीम लिडर रामकिसन शर्मा यांच्यावरही जबाबदारी पार न पाडल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रमोद काळूराम हंबीर यांनी फिर्याद दिली. त्यानुसार २० नोव्हेंबर रोजी रात्री सुमारे ११ वाजता अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १९६/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०५ आणि ३(५) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT