महाड : मुंबई-गोवा महामार्गावर नडगाव गावाच्या हद्दीत रविवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास दरड रस्त्यावर आल्याने गोव्याच्या दिशेने जाणारी वाहतूक काही काळासाठी सुरक्षेच्या कारणास्तव बंद करण्यात आली होती. दरडीचे मोठे तुकडे रस्त्यावर पडल्याने वाहनचालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, महामार्ग विभागाने तातडीने केलेल्या उपाययोजनांमुळे हे वातावरण दूर होण्यास मदत झाली. सुदैवाने या घटनेत कोणताही अपघात अथवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
दरड रस्त्यावर आल्याची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, महामार्ग विभागाचे कर्मचारी व एल अँड टी कंपनीचे कामगार तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दरड हटविण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेऊन अर्ध्या तासात पूर्ण करण्यात आले. त्यामुळे हा मार्ग आता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. शनिवारी रात्री व रविवारी पहाटे महाड परिसरात मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे डोंगरउतारावर मोठ्या प्रमाणात दरड कोसळून ती रस्त्यावर आल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली.
मुंबई-गोवा महामार्गावरील या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापनाच्या यंत्रणांनी युद्धपातळीवर काम करत मार्ग मोकळा केला. त्यामुळे गोव्याकडे जाणाऱ्या नागरिकांना होणारा त्रास काही काळातच आटोक्यात आणण्यात मदत झाली. सद्यस्थितीत रस्त्यावर आलेली दरड पूर्णपणे हटविण्यात आली असून, या मार्गावरून दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.