नाते : किल्ले रायगडावरील टकमक टोका वरून खेड येथील ३७ वर्षीय तरुण शनिवारी सकाळ पासून किल्ले रायगडावरून बेपत्ता असल्याच्या वृत्तानंतर स्थानिक पोलिसांनी शोध मोहिम सुरु केली. या शोध मोहिमेत रविवारी सकाळी पूर्ण झाल्या मोहिमेत सदर तरुणाचा मृतदेह आढळून आला.
या संदर्भात पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिस प्रशासनाने शनिवारी सायंकाळपासून रेस्क्यु टिमच्या मदतीने शोध मोहीम सुरू केली होती. परंतु रात्र झाल्याने थांबवलेली ही शोध मोहीम रविवारी सकाळी पुन्हा सुरु करण्यात आली. ड्रोन कॅमेऱ्याच्या सहाय्याने मृतदेहाचा शर्ट खोल दरीत डिटेक्ट झाल्यानंतर अथक परिश्रमानंतर रेस्क्यु टिमचे जवान आपदा मित्र व पोलिसांनी मृतदेह बाहेर काढला.
याबाबत महाड तालुका पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की सुयोग सुरेश पांचाळ (वय ३७, रा. बीजघर, खेड, रत्नागिरी; सध्या रा. रामनगर, वागळे इस्टेट, ठाणे) हे ३ ऑक्टोबर रोजी पहाटे किल्ले रायगडाच्या पायथ्याशी आपल्या आर्टिगा कार क्रमांक MH 04 MR 6167 ही गाडी पायथ्याशी पार्क करून तो पायरी मार्गाने किल्ल्यावर गेला.
सकाळी साडेसातच्या सुमारास ते टकमक टोक परिसरात पोहोचले. त्यानंतर त्यांनी पत्नीला व्हॉट्सॲपवर संदेश पाठवून जीवन संपविण्याबाबत सूचक संदेश पाठविल्याची माहिती नातेवाईकांकडून मिळाली. त्यानंतर त्यांचा मोबाईल बंद झाला.
या प्रकाराची माहिती मिळताच त्यांच्या भावाने किल्ले रायगड परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. तसेच पोलिसांना माहिती देण्यात आल्यानंतर पोलिस पथकानेही रेस्क्यु टिम व आपदा मित्रांच्या मदतीने शनिवारी दुपार नंतर गड परिसरात शोधमोहीम हाती घेतली. पायथ्याशी संबंधित व्यक्तीचे वाहन आढळून आले.
शनिवारी रात्र झाल्याने रविवारी सकाळपासून शोधमोहीम अधिक व्यापक करण्यात आली. ड्रोनच्या सहाय्याने परिसराची पाहणी केली असता संशयित ठिकाणी मृतदेह आढळल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मृतदेह बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू टीमकडून प्रयत्न सुरू करण्यात आले.
या शोधमोहिमेत रेस्क्यू टीम कोलाडचे सागर दहीआंबेकर, एडवेंचर सोल महाडचे विशाल खांबे, शिलेदार एडवेंचर सोल कोल्हापूरचे सागर नलावडे तसेच आपदा मित्र महाडचे टीम लीडर अमिताभ जाधव यांच्यासह रेस्क्यू सदस्य सहभागी झाले आहेत.
घटनास्थळी तालुका पोलीस निरीक्षक अभिजीत नेवसे हे घटनास्थळी उपस्थित राहून मार्गदर्शन करीत होते. पोलिस प्रशासन आणि रेस्क्यू पथकाकडून अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थितीत शोध व बचावकार्य करीत अखेर मृतदेह बाहेर काढून शव विच्छेदनासाठी महाड येथे शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आहे.