रायगडमधील हॉटेल, कॉटेजला मिळणार ‘स्वच्छता हिरवे पान मानांकन’ File Photo
रायगड

Raigad News | रायगडमधील हॉटेल, कॉटेजला मिळणार ‘स्वच्छता हिरवे पान मानांकन’

पुढारी वृत्तसेवा

रायगड : हॉटेल, लॉज, होमस्टेज, धर्मशाळांमध्ये पर्यटकांना, नागरिकांना स्वच्छतेच्या दर्जेदार सेवा मिळण्यासाठी ‘स्वच्छता हिरवे पान मानांकन’ (ग्रीन लीफ रेटिंग) प्रणाली रायगड जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. त्यानुसार संबंधित आस्थापनांना मानांकन दिले जाणार आहे. पर्यटनवाढीसाठी जिल्ह्यातील सर्वांनी यामध्ये सहभागी व्हा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड व पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी शुभांगी नाखले यांनी केले आहे.

ग्रामीण भागातील पर्यटक अनुकुल स्वच्छता सुविधांचे मूल्यमापन करणे (ग्रीन लीफ रेटिंग इन हॉस्पिटॅलिटी फॅसिलिटीज) प्रस्तावित आहे. त्यामुळे सेवाक्षेत्रातील स्वच्छता सुविधा अधिक दर्जेदार होण्यासाठी प्रोत्साहन मिळणार आहे. मूल्यांकनामुळे अशा व्यावसायिक आस्थापनांमध्ये विधायक स्पर्धेचे वातावरण निर्माण होऊन त्याचा पर्यटनवृद्धीत उपयोग होऊन जिल्ह्याची प्रतिमा उंचावण्यास मदत होणार आहे.

हिरवे पान मानांकनासाठी जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन केली आहे. उपाध्यक्षपदी मुख्य कार्यकारी अधिकारी, सदस्य सचिवपदी पाणी व स्वच्छता विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तर सदस्य म्हणून पर्यटन विभाग किंवा एमटीडीसी जिल्हा प्रतिनिधी आणि जिल्हाधिकार्‍यांच्या मान्यतेने पर्यटन किंवा हॉटेल उद्योगातील प्रतिनिधींचा त्यामध्ये समावेश असेल. तर तालुकास्तर समिती उपविभागीय दंडाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली आहे. या समितीच्या सदस्यपदावर गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग उपअभियंता, स्वच्छ भारत मिशनचे विस्तार अधिकारी यांचा समावेश असणार आहे.

पाणवठ्यामधील प्रदूषण रोखून पर्यावरण स्वच्छ ठेवणे हा स्वच्छता ग्रीन लीफ रेटिंग प्रणालीचा उद्देश आहे. हिरवे पान मानांकन प्रणाली 200 गुणांची आहे. घनकचरा व्यवस्थापन 80 गुण, मैला गाळ व्यवस्थापन 80 गुण, सांडपाणी व्यवस्थापनासाठी 40 गुण असणार आहेत.

रायगड जिल्ह्यात पर्यटनाला मोठी संधी आहे. जिल्ह्याला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. निसर्गाने भरभरून दिले आहे. एका बाजूला विस्तीर्ण समुद्र किनारा, धार्मिक स्थळे यामुळे विविधांगी पर्यटनाला मोठी संधी येथे आहे.

हिरवे पान मानांकन प्रणाली उपक्रमाचा पर्यटन वृद्धीस उपयोग होऊन जिल्ह्याची प्रतिमा उंचावण्यास मदत होणार आहे. जिल्ह्यातील हॉटेल्स, लॉज होम स्टेज, धर्मशाळा यांनी या उपक्रमात सहभागी होऊन पर्यटन वृद्धीच्या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा.
डॉ. भरत बास्टेवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड जिल्हा परिषद

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT