महाड (रायगड) : छत्री निजामपूर ते वाघेरी वारंगी हा सुमारे दोन किलोमीटर रस्ता काळ कुंभे प्रकल्पाच्या कात्रीत सापडला आहे. हा मार्ग पूर्ण झाला तर माणगाव शहर, मुंबई कडे जाण्यासाठी दोन तासांचे अंतर कमी होईल.
यासंदर्भात महाड तालुक्यातील पाणी येथे राहणारे संजय दानवले यांच्याशी संपर्क साधून परिसरातील या अनेक वर्ष प्रतीक्षेत असलेल्या रस्त्यांसंदर्भात चर्चा केली असता त्यांनी परिसरातील अभ्यासपूर्ण पद्धतीने विवेचन करून यातील शासनाकडून सुरू झालेल्या काळ कुंभे जलविद्युत प्रकल्पामध्ये काही भाग जात असल्याचे नमूद करून अन्य मार्गाने या भागाला मुख्य तालुक्याच्या भागाशी जोडणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.
यासंदर्भात राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांनी लक्ष देऊन याबाबत युद्ध पातळीवर मार्ग काढावा अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.
महाड तालुक्यातील महत्त्वाची स्वराज्याची राजधानी दुर्गे दुर्गेश्र्वर राजधानी रायगड व वाळण, बिरवाडी विभाग यांना जोडणारा प्रस्तावित सुमारे दोन किलोमीटर अंतरावर असलेला मार्ग जर झाला तर महाड मार्गे वळसा घालून जाण्याऐवजी वाळण मांघरूण-वाघेरी-वारंगी ते छत्री निजामपूर किंवा वाघेरी ते टकमक वाडी व रायगड वाडी पाचाड पुनाडेवाडी मार्गे रायगड मार्गाने अर्धा तासात पोचता येईल आणि वळसा घालून येणारे दोन तासाचे नंतर अर्धा तासावर येईल. वेळ-इंधन बचत होईल. हिंदवी स्वराज्याची राजधानी दुर्गे दुर्गेश्र्वर किल्ले रायगड अजून पुणे मार्गे, ताम्हणी मार्गे, वाकी वाळण विभाग जोडला जाईल पण जर हा दोन किलोमीटर रस्ता जोडला गेला तर वारंगी ते बावळे सांदोशी बांधणीचा माळ ते पुनाडेवाडी, वाघेरी ते रायगडवाडी पाचाड पुनाडेवाडी, वाघोली ते हिरकणी वाडी पाचाड ते पुनाडेवाडी, असे तीन पर्याय आहेत दिसून येतात. पण पर्याय एक हा काही भाग काळ कुंभे प्रकल्पाच्या कार्यक्षेत्रात मोडतो. त्यामुळे धोका ओळखून तेथे रस्ता होऊ शकत नाही जर प्रकल्प होत नाही तर हा पर्याय पण उत्तम आहे.
स्थानिकांना योग्य मोबदला दिल्याशिवाय पूर्ण पुनर्वसन झाल्याशिवाय हा प्रकल्प होणार नाही असे आतातरी दिसते. सुमारे पंचवीस वर्षे झाली तरी हा प्रकल्प अधांतरीच आहे. म्हणून जर हे सगळे मुद्दे लवकर निकाली काढले तर या मार्ग लवकरच होईल आणि पैसा, वेळ, इंधन वाचून राजधानी रायगड चारही बाजूंनी जवळ येईल, या अपेक्षेने रायगडच्या पायथ्याशी राहणारी जनता शासनाच्या निर्णयाची प्रतीक्षा करीत आहे.