रोहे : मध्य रेल्वेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मालवाहतुकीच्या क्षेत्रात ऐतिहासिक कामगिरी नोंदवली आहे. ७९.३४ दशलक्ष टन (MT) मालाची विक्रमी वाहतूक करत रेल्वेने ८,२७९ कोटी रुपयांचा महसूल जमा केला आहे. विशेष म्हणजे, या एकूण कामगिरीमध्ये नागपूर विभागाने ५४ टक्के वाटा उचलत मध्य रेल्वेच्या तिजोरीत मोलाची भर घातली आहे.
नागपूर विभागाचे वर्चस्व मध्य रेल्वेच्या पाचही विभागांमध्ये नागपूर विभागाने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. या विभागाने एकट्याने ४२.७२ दशलक्ष टन मालाचे लोडिंग केले असून, त्यातून ४,५९७ कोटींचे उत्पन्न मिळाले आहे. हे उत्पन्न मध्य रेल्वेच्या एकूण मालवाहतूक महसुलाच्या ५५ टक्के इतके आहे.
कोळसा आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतुकीत मोठी वाढ रेल्वेने दिलेल्या आकडेवारीनुसार, एकूण मालवाहतुकीत कोळशाचा वाटा ४५ टक्के (३३.९२ दशलक्ष टन) इतका आहे. याशिवाय कृषी उत्पादनांमध्ये विशेषतः कांदा वाहतुकीत १३३ टक्के आणि अन्नधान्य वाहतुकीत १७.६ टक्के वाढ झाली आहे. लोहखनिज (१७७% वाढ) आणि पेट्रोलियम उत्पादनांच्या (२,६७२ रेक्स) वाहतुकीतही रेल्वेने आतापर्यंतची सर्वोत्तम आकडेवारी गाठली आहे.
पायाभूत सुविधांचा विस्तार मालवाहतुकीला गती देण्यासाठी मध्य रेल्वेने मोसा, मकरधोकरा, मुंगोली आणि लोणावळा यांसारख्या महत्त्वाच्या ठिकाणी नवीन माल टर्मिनल (GCT) आणि सायडिंग्स कार्यान्वित केल्या आहेत. बल्लारशाह येथील नवीन टर्मिनलमुळे स्टील आणि लोहखनिज वाहतुकीला मोठी गती मिळाली आहे.
आर्थिक विकासाला गती मध्य रेल्वेने आपल्या दीर्घ पल्ल्याच्या मालगाड्यांच्या संख्येत १०० टक्क्यांहून अधिक वाढ केली असून ती आता ७१९ पर्यंत पोहोचली आहे. या कार्यक्षम वाहतुकीमुळे बाजारात कांदा आणि अन्नधान्याचा पुरवठा सुरळीत राहून दर स्थिर राहण्यास मदत होत आहे. तसेच सिमेंट आणि स्टीलच्या अखंड पुरवठ्यामुळे देशातील पायाभूत विकासकामांना गती मिळत आहे. एकूणच, मध्य रेल्वेने आपल्या जलद आणि किफायतशीर सेवेद्वारे देशाच्या आर्थिक प्रगतीत कणा म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे.