Bharat Gogawale  file photo
रायगड

Raigad News : चाकरमान्यांचा प्रवास सुकर करण्यासाठी मंत्री भरत गोगावले ॲक्शन मोडमध्ये; महामार्गाच्या कामांचा घेतला आढावा

पुढारी वृत्तसेवा

महाड : राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत शेठ गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (दि. ५) कोकण भवन येथे राष्ट्रीय महामार्गांच्या विविध प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या लाखो चाकरमान्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुरळीत व्हावा, यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली. बैठकीत राष्ट्रीय महामार्गांशी संबंधित १० महत्त्वाच्या विषयांवर सखोल विचारविनिमय करण्यात आला.

बैठकीत पुणे–पौड–मुळशी–माणगाव–म्हसळा–दिघी बंदर (राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ एफ) या मार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव ठळकपणे मांडण्यात आला. दिघी बंदराचा वाढता विकास, दिल्ली–मुंबई औद्योगिक कॉरिडॉर आणि भविष्यातील वाढती वाहतूक लक्षात घेता हा मार्ग चौपदरी करणे अत्यावश्यक असल्याचे मंत्री गोगावले यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पामुळे पुणे आणि कोकणातील दळणवळण अधिक वेगवान आणि सुरक्षित होण्यास मोठी मदत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याशिवाय राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील माणगाव आणि इंदापूर बायपास संदर्भातही महत्त्वपूर्ण चर्चा झाली. सध्या सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामासोबतच अतिरिक्त जोडरस्ता विकसित करून शहराभोवती रिंगरोडसदृश व्यवस्था उभारण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. यामुळे भविष्यातील वाहतूक कोंडी कमी होण्याबरोबरच बंदराधारित औद्योगिक विकासालाही चालना मिळणार असल्याचे मंत्री गोगावले यांनी नमूद केले.

बैठकीत स्थानिक नागरिकांच्या विविध मागण्यांनाही प्राधान्य देण्यात आले. कामोडी घाट बोगदा प्रकल्पातील मध्य विभक्तकात (डिव्हायडर) मार्ग उपलब्ध करून देणे, महाड तालुक्यातील साहिलनगर–गांधारपाले, दासगाव–वहूर तसेच दासगाव स्मशानभूमीकडे जाणाऱ्या मार्गांवर सेवा रस्ते व पदपथ उभारणे, राजेवाडी फाटा–म्हाप्रळ मार्गावरील सावित्री नदीकाठी संरक्षक भिंत उभारणे, कोंझर घाट व वरंधा घाटातील भूस्खलनप्रवण भागात उतार स्थिरीकरणाची कामे करणे, तसेच वीर आणि उगवतवाडी येथे बस बे व प्रवासी निवारे उभारणे या मागण्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे मंत्री गोगावले यांनी ठामपणे मांडल्या.

बैठकीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना मंत्री भरत शेठ गोगावले म्हणाले की, "गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना कोणतीही अडचण येऊ नये, यासाठी आज संपूर्ण आढावा घेण्यात आला. माणगाव–इंदापूर बायपासची किमान एक लेन गणपतीपूर्वी वाहतुकीसाठी खुली करण्याचा आमचा प्रयत्न आहे. पावसाने साथ दिल्यास अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदार रात्रंदिवस काम करून हे उद्दिष्ट पूर्ण करतील."

यावेळी त्यांनी माणगाव आणि इंदापूरमधील व्यापारी, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना विशेष आवाहन करताना सांगितले की, "गणेशोत्सवाच्या काळात मुख्य रस्त्यावर वाहने उभी करू नयेत. रस्ते रुंद झाले असले तरी रस्त्यावरील पार्किंगमुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. वाहने पर्यायी ठिकाणी उभी केल्यास लाखो गणेशभक्तांचा प्रवास अधिक सुरळीत होईल."

राज्य शासनाच्या माध्यमातून कोकणातील राष्ट्रीय महामार्गांचे जाळे अधिक सक्षम, सुरक्षित आणि आधुनिक करण्यासाठी सातत्याने पाठपुरावा सुरू असून, गणेशोत्सवापूर्वी महत्त्वाची कामे पूर्ण करण्यासाठी मंत्री भरत शेठ गोगावले यांनी संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना दिल्या.

या बैठकीत सार्वजनिक बांधकाम विभागाचे (कोकण विभाग) सचिव श्री. शेलार यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT