अलिबाग | एक कार्ड, एक विद्यार्थी या संकल्पनेवर ’अपार आयडी कार्ड’ नोंदणी राज्यभर सुरू आहे. जिल्ह्यात 5 लाख 20 हजार 288 विद्यार्थ्यांची नोंदणी केली जाणार असून त्यासाठी विशेष नोंदणी मोहीम राबवली जात आहे. अपार नोंदणीत रायगड जिल्हयात पोलादपूर तालुका अग्रेसर असून त्यांचे 88 टक्के काम पूर्ण झाले आहे.
‘अपार’ म्हणजे अॅटोमेटेड परमनंट अॅकॅडमिक अकाऊंट रजिस्ट्री. केंद्र सरकारचे शिक्षण मंत्रालय अपार आयडी कार्ड तयार करीत आहे. प्रत्येक विद्यार्थ्यास युनिक क्रमांक देण्यात येणार आहे. हा 12 आकडी क्रमांक म्हणजे विद्यार्थ्यांची ओळखच असणार आहे. लहानपणापासून ते विद्यार्थ्यांचे शिक्षण होईपर्यंत हे कार्ड त्याची ओळख असेल. विद्यार्थ्याने शाळा बदलली तरी अपार आयडी कार्ड एकच राहणार असून ते बदलणार नाही. आधार आणि अपार कार्ड हे संलग्न राहून ते लिंक असतील. या कार्डमधील माहिती आपोआप अपडेट होत राहील.
विद्यार्थ्यांची अपार नोंदणी करण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचा शिक्षण विभाग युदध पातळीवर काम करीत आहे.त्यासाठी 29 व 30 नोव्हेंबर हे दोन दिवस अपार दिन म्हणून तर 9 आणि 10 डिसेंबर हे दोन दिवस मेगा अपार दिन म्हणून साजरे करण्यात आले. जिल्हयात एकूण 5 लाख 20 हजार 288 विद्यार्थ्यांची ‘अपार’ नोंदणी होणे आवश्यक आहे.
आतापर्यंत 3 लाख 58 हजार 147 विद्यार्थ्यांची नोंदणी झाली आहे. हे प्रमाण68.84 टक्के इतके आहे. विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव, पत्ता, त्याचा आधार कार्ड यांची नोंद होणार आहे. आयडीसाठी पालकाचा मोबाईल क्रमांक, आधार कार्डची नोंदणी आवश्यक. विद्यार्थ्यांचे नाव, इयत्ता, तुकडी, शाळा, राज्य यांची माहिती नोंदविण्यात येणार आहे. हे कार्ड म्हणजे विद्यार्थ्याचे एक प्रकारचे ओळखकार्डच आहे. जिल्हयात हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत.- पुनिता गुरव, शिक्षणाधिकारी, रायगड जिल्हा परिषद
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 ने देशाच्या एकूणच शैक्षणिक पदधतीत अमुलाग्र बदल करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यात अभ्यासक्रमाबरोबरच कार्यपदधतीतदेखील बदल होत आहेत. यातीलच एक अपार उपक्रम कार्यान्वीत करण्यात आला आहे. ’अपार कार्ड’ मध्ये संपूर्ण माहिती डिजिटल स्वरुपात जतन करण्यात येईल. हे कार्ड म्हणजे त्यांचे शिक्षण माहितीपत्रच असेल. विद्यार्थ्याने कोणत्या इयत्तेपर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्याला कोणती बक्षिसे, प्रमाणपत्रे मिळाली. त्यांची शैक्षणिक गुणवत्ता आणि क्रीडा निपुणता याचा आलेखच हे कार्ड असेल. त्यांना शिष्यवृत्ती मिळत असेल तर त्याची माहिती देण्यात येईल.
’अपार कार्ड’ तयार करण्यासाठी विद्यार्थ्याकडे आधार कार्ड असणे आवश्यक आहे. ’डिजिलॉकर’ वर त्याचे खाते असणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्याचे केवायसी पूर्ण होईल. ’अपार कार्ड’ संबंधित शाळा, महाविद्यालये नोंदणी करुन देतील. त्यासाठी आई-वडिलांची सहमती घेण्यात येईल. डिजीलॉकर मधील कागदपत्रे ही भारतीय माहिती तंत्रज्ञान कायदा 2000 नुसार अधिकृत मानली आहेत.