बाजारात मुबलक प्रमाणात आणि परिपक्व ओले काजूगर उपलब्ध होत आहेत. Pudhari News Network
रायगड

Raigad News | ओल्या काजूगरांची मेजवानी झाली स्वस्त, किंमती आवाक्यात

रायगड जिल्ह्यातील बाजारात काजूगर खरेदीसाठी होतेय ग्राहकांची गर्दी

पुढारी वृत्तसेवा

सुधागड : संतोष उतेकर

ओले काजू गर म्हटले की सगळ्यांच्याच जिभेला पाणी सुटते. सध्या जिल्ह्यात या ओल्या काजूगराचा हंगाम बहरला आहे. त्यामुळे बाजारात मुबलक प्रमाणात आणि परिपक्व ओले काजूगर उपलब्ध होत आहेत. तसेच मागील महिन्यापेक्षा या महिन्यात काजूगर निम्म्याने स्वस्त झाले आहेत. परिणामी खवय्यांची खरेदीसाठी लगबग सुरू आहे. रायगड जिल्ह्यात येणारे पर्यटन देखील आवर्जून काजुगर खरेदी करतात आहेच.

मागील महिन्यात असलेल्या दरापेक्षा आताचा दर खूप कमी झाला आहे. मागील महिन्यात जवळपास तीनशे ते चारशे रुपये शेकड्याने मिळणारे काजूगर आता 200 ते 150 रुपये शेकड्याने उपलब्ध आहेत. तर 50 रुपयांना एक वाट्याने मिळणारे अर्धे काजूगर आता 50 रुपयांना दोन वाटे मिळत आहेत. काजुचे फळ तयार होण्यापुर्वी येणारी बी काढून त्यातील गर काढला जातो. त्याची भाजी करुन खाल्ली जाते. आदिवासी महिला हा रानचा मेवा मुबलक प्रमाणात विकायला घेवून येत आहेत.

जिल्ह्यातील निसर्ग सौंदर्याने नटलेला डोंगराळ भाग व जंगलामध्ये काजुची झाडे विपुल प्रमाणात आहेत. तसेच अनेक बागायतदारांच्या स्वतःच्या खाजगी काजुच्या बागा देखिल आहेत. जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून या झाडांवर काजुच्या बिया येवू लागल्या आहेत. आणि या काजुच्या बिया तोडून काजूगर आदिवासी महिला बाजारात विकण्यासाठी घेवून येत आहेत. श्रीवर्धन, म्हसळा, माणगाव, महाड, अलिबाग यासह इतर तालुक्यात काजूगर शेकड्याने मिळतात. तर रोहा, सुधागड आदी तालुक्यात अर्धे काजूगर वाट्यावर मिळतात. अगदी जून महिन्यापर्यंत ओल्या काजुच्या बियांचा हंगाम सुरु असतो. काजुच्या बिया विकून आदिवासींच्या हाती चांगले पैसे देखील मिळतात. पण यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते.

चविष्ट काजुगरांची घ्या मज्जा

काजूगर वेगवेगळ्या प्रकारे खाल्ले जातात. काजुच्या बियांचा रस्सा किंवा सुकी भाजी करुन खाल्ली जाते. काजूगराचा पुलाव व बिर्याणी देखील केली जाते. तसेच मटन, मच्छी, व सुक्या मासळी मध्ये टाकून सुद्धा काजुगर खाल्ले जातात. अशा या चविष्ट आणि स्वादिष्ट काजूगर जेवणाची लज्जत वाढवितात.

काजूगर काढण्यासाठी मेहनत आणि हातांची दुरवस्था

दुर्गम, डोंगराळ भागात आणि जंगलात काजुच्या बिया काढण्यासाठी जावे लागते. आदिवासी बांधव अनवाणी उन्हातान्हात बिया काढण्यासाठी जातात. या बियांना मोठ्या प्रमाणात चिक असतो. त्यामुळे त्यांचे हात चिकामुळे पुर्णपणे खराब होतात. अशा प्रतिकुल परिस्थितीमध्ये आदिवासींना बिया काढून विकाव्या लागतात. शासनाकडून त्यांना हातमोजे देणे तसेच सहाय्य करणे गरजेचे आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT