रायगड

Dahi Handi Festival Raigad : दहीहंडीच्या आनंदोत्सवाचे रूपांतर दुर्घटनेत; विजेचा धक्का बसून सात जण जखमी

पुढारी वृत्तसेवा

विक्रम बाबर

पनवेल : शहरातील लाईन आळी परिसरात तब्बल ३०० वर्षांची धार्मिक आणि पारंपरिक परंपरा जपत साजऱ्या होणाऱ्या दहीहंडी उत्सवाला यंदा दुर्दैवी गालबोट लागले. मानवी मनोरा न रचता अवघ्या सहा ते सात फूट उंचीवर दहीहंडी फोडण्याची अनोखी परंपरा असलेल्या या उत्सवात विजेचा प्रवाह उतरल्याने एका सात वर्षीय चिमुकलीसह सात जणांना विजेचा धक्का बसला. या घटनेमुळे उत्सवाच्या आनंदावर क्षणार्धात विरजण पडले.

पनवेल शहरातील शिवसेना शाखेजवळ असलेल्या नवनाथ पंथीय आस्थानात ही दहीहंडी पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते. गेल्या अनेक पिढ्यांपासून ही परंपरा जपली जात असून, येथे इतर ठिकाणांप्रमाणे उंच मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडली जात नाही. केवळ सहा ते सात फूट उंचीवर दहीहंडी बांधून ती फोडली जाते. त्यामुळे या उत्सवाला पनवेलच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेत विशेष महत्त्व आहे.

या उत्सवाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आस्थेचा भाग म्हणून आजही काही भक्तांकडून आसुडाचे फटके घेण्याची परंपरा पाळली जाते. श्रद्धा, भक्ती आणि पारंपरिक विधी यांचा संगम असलेल्या या उत्सवासाठी दरवर्षी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

यंदाही उत्साहात दहीहंडी उत्सव सुरू असताना दुपारपर्यंत पावसाने दडी मारली होती. त्यामुळे आयोजकांनी गोविंदांवर पाण्याचा फवारा मारण्याची व्यवस्था केली. मात्र, हीच व्यवस्था अंगलट आल्याचे दिसून आले. पाण्याच्या संपर्कामुळे विजेच्या लोखंडी खांबाला बांधलेल्या तारेत विद्युत प्रवाह उतरल्याचे सांगण्यात येते. या तारेच्या संपर्कात आलेल्या सात जणांना विजेचा जोरदार धक्का बसला.

घटना घडताच उत्सवस्थळी एकच गोंधळ उडाला. उपस्थितांनी तातडीने जखमींना उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात दाखल केले. जखमींपैकी काहींना डॉ. गुणे हॉस्पिटल, काहींना डॉ. पटवर्धन हॉस्पिटल, तर काहींना एमजीएम रुग्णालय, कामोठे येथे उपचारासाठी हलविण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर काही जखमींना घरी सोडण्यात आले असून, काहींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पनवेल महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने विद्युत पुरवठा खंडित केला. उपकार्यकारी अभियंता धनंजय सातपुते यांनी ही माहिती दिली. पनवेल शहर पोलिसांनीही घटनास्थळी धाव घेत घटनेची माहिती घेतली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT