MP Sunil Tatkare pudhari photo
रायगड

MP Sunil Tatkare : नवीन जिल्हा झाल्यास माणगावच मुख्यालय

खासदार सुनील तटकरे यांचा ठाम विश्वास; नवीन जिल्ह्याच्या निर्मितीच्या चर्चेला नवे बळ

पुढारी वृत्तसेवा

माणगाव : अरुण पवार

रायगड जिल्ह्याची भविष्यात प्रशासकीय पुनर्रचना होऊन नवीन जिल्ह्याची निर्मिती झाली, तर त्या नव्या जिल्ह्याचे मुख्यालय आणि राजधानी माणगाव येथेच व्हावी, असा ठाम विश्वास खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला आहे. माणगावचे मध्यवर्ती भौगोलिक स्थान, दळणवळणाच्या उपलब्ध सुविधा, शैक्षणिक संकुले आणि विविध शासकीय कार्यालये यांचा विचार करता माणगाव हे जिल्ह्याचे मुख्यालय होण्यासाठी सर्वार्थाने योग्य ठिकाण असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

एवढेच नव्हे, तर माणगावला रायगडच्या नव्या जिल्ह्याचे मुख्यालय करण्याचा निर्णय एक हजार एक टक्के होईल, असा विश्वासही त्यांनी ठासून व्यक्त केला. त्यांच्या या विधानामुळे माणगावच्या जिल्हा मुख्यालयाच्या मागणीला नव्याने बळ मिळाले आहे.

माणगाव येथील श्रीमती गीता दत्तात्रय तटकरे नर्सिंग कॉलेजच्या तिसऱ्या आणि चौथ्या मजल्याच्या बांधकामाच्या भूमिपूजन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

माणगावची मोठी जमेची बाजू

रायगड जिल्ह्याच्या भौगोलिक रचनेचा विचार करता माणगाव हे मध्यवर्ती ठिकाण आहे. मुंबई-गोवा महामार्ग, पुणे-दिघी महामार्ग, रेल्वे स्थानक, बसस्थानक आणि विविध राज्यस्तरीय व अंतर्गत रस्त्यांच्या माध्यमातून माणगावला दळणवळणाच्या सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील विविध भागांतून नागरिकांना येथे येणे-जाणे तुलनेने सोयीचे ठरते.

शिक्षण, आरोग्य सुविधांचे केंद्र

माणगावमध्ये माध्यमिक आणि उच्च शिक्षणासाठी विविध शैक्षणिक संस्था व संकुले उभारण्यात आली आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांचे शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. माणगावजवळील लोणेरे येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ असल्याने उच्च तांत्रिक शिक्षणासाठीही परिसराला महत्त्व प्राप्त झाले आहे. याशिवाय माणगाव येथे उपजिल्हा रुग्णालय आणि उपजिल्हा न्यायालय उपलब्ध असल्याने आरोग्य व न्यायव्यवस्थेच्या दृष्टीनेही हे शहर महत्त्वाचे केंद्र बनले आहे. पंचायत समिती, तहसील कार्यालयासह विविध शासकीय कार्यालयांच्या इमारती आणि प्रशासकीय सुविधा येथे उपलब्ध आहेत.

या सुविधांमुळे जिल्हा मुख्यालयासाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत व्यवस्थेचा पाया माणगावमध्ये आधीपासूनच तयार असल्याचे चित्र आहे. जिल्ह्याचे मुख्यालय माणगाव येथे झाल्यास महाड, पोलादपूर, खेड, दापोली, मंडणगड, श्रीवर्धन, मुरूड, रोहा आणि पाली या भागांतील नागरिकांना प्रशासकीय कामांसाठी ये-जा करणे अधिक सुलभ होऊ शकते. शासकीय कामांसाठी लांबचा प्रवास, वेळ आणि आर्थिक खर्च यांचा त्रास कमी करण्याच्या दृष्टीनेही माणगावची निवड महत्त्वपूर्ण ठरू शकते.

माणगाव शहराचा भौगोलिक विस्तारही लक्षणीय आहे. शहराचा परीघ सुमारे १४ किलोमीटर असल्याचे सांगितले जाते. इतर काही तालुक्यांच्या शहरांच्या तुलनेत माणगावचा विस्तार मोठा असून लोकवस्तीही सातत्याने वाढत आहे. काळ आणि गोधडी नद्यांच्या परिसरामुळे पाण्याच्या उपलब्धतेच्या दृष्टीनेही माणगावला महत्त्व आहे. त्यामुळे भविष्यातील प्रशासकीय आणि नागरी विस्तारासाठी या शहरात विकासाच्या मोठ्या संधी आहेत.

नागरी सुविधांच्या विस्ताराला मिळणार नवी दिशा

सर्व भागांना जोडणारे मध्यवर्ती ठिकाण म्हणून माणगावची निवड झाल्यास नागरिकांना प्रशासकीय सुविधा अधिक जवळ उपलब्ध होतील आणि संपूर्ण परिसराच्या विकासाला चालना मिळेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. माणगावला जिल्ह्याचे मुख्यालय­ मिळणे म्हणजे केवळ प्रशासकीय दर्जा मिळणे नव्हे, तर शिक्षण, आरोग्य, रोजगार, व्यापार, वाहतूक आणि नागरी सुविधांच्या विस्ताराला नवी दिशा मिळण्याची संधी आहे. त्यामुळे माणगावच्या या मागणीला भविष्यात कोणते स्वरूप प्राप्त होते, याकडे संपूर्ण दक्षिण रायगडचे लक्ष लागले आहे.

नवीन जिल्हे निर्माण करण्याच्या हालचाली

राज्यात सध्या ३६ जिल्हे आहेत. महाराष्ट्राची स्थापना १ मे १९६० रोजी झाली, त्यावेळी फक्त २५ जिल्हे अस्तित्वात होते. कालांतराने जिल्ह्यांची संख्या वाढत गेली. २०१४ मध्ये ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली होती. सध्या अस्तित्वात असलेले जिल्हे तसेच काही तालुक्यांची ठिकाणे भौगोलिकदृष्टया गैरसोयीची असल्याचे राजकीय पक्षांच्या नेत्यांनी जनतेच्या मागणीनुसार जिल्हा निर्मितीची मागणी केली आहे. एक जिल्हा निर्मितीसाठी सुमारे ३५० कोटी रुपये खर्च येतो. सध्या काही जिल्हयांचे विभाजन करून नवीन जिल्हे निर्माण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यात रायगड-महाड असे विभाजन होवू शकते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT