Murud Paddy Cultivation Pudhari
रायगड

Murud Paddy Cultivation: मुरुडमध्ये ८० टक्के भातलावणी पूर्ण; मजुरांची टंचाई

काही ठिकाणी चारसूत्री पद्धतीने भात लागवड

पुढारी वृत्तसेवा

सुधीर नाझरे

मुरुड जंजिरा: मुरुड तालुक्यात यंदा १९२१ मि मी इतका समाधानकारक पाऊस पडल्यामुळे भात लावणी ८० टक्के पूर्ण झाली आहे. मात्र गतवर्षीच्या तुलेनेत एल निनोच्या कारणास्तव पाऊस कमी पडला.

गेल्या वर्षीच्या दमदार पावसामुळे खारपट्टयासह सखल भागातील शेती लावण्यात शेतकरी वर्ग जुलैच्या शेवटच्या आठवड्या पासुन व्यस्त दिसुन येत होता. परिणामी १०० टक्के भात लावणीचे काम पुर्ण झाली होती.

यंदा मात्र हे प्रमाण ८० टवके पूर्ण झाल्याची माहिती कृषि विभागाने दिली. यंदा बऱ्याच शेतकऱ्यांना धुळ पेरणी फुकट गेल्याने रहू पद्धतीचा वापर करावा लागला. धुळ पेरणीची रोपे थेट जमिनीवर उगवण झाल्याने आवण जोमदार असते. रहू पद्धती ने तयार केलेले आवण तितकेसे परिणामकारक नसल्याची माहिती शेतकरी दिनेश मिणमिणे यांनी दिली.

मुरुड तालुक्यात ३३०० हे. भात लागवडीचं क्षेत्र असुन या क्षेत्रामध्ये शेतकरी सुवर्णा, जया, रूपाली, चिंटू, वाडा कोलम, रत्ना, शुभांगी, कर्जत व खारपट्यात जमिनीवर - पनवेल, इत्यादी भाताच्या जातीची लागवड करण्यात आली आहे. भात लावणीच्या कामात दरवर्षी प्रमाणे यंदा ही मजुरांची टंचाई भास त आहे. खरीप हंगामातील भात हे एकमेव पीक असल्यामुळे लावणी साठी पटेल वा रोजंदारीवर बायका माणसे शेतात राबतांना दिसत होती.

नांगऱ्यांना निपोटी १ हजार रुपये तर पुरुषांना ६०० तर महिलांना ३०० ते ४०० रुपये मजुरी द्यावे लागते. समाधानकारक झालेल्या पावसामुळे भात रोपवाटिका उत्तम प्रकारे तयार झाल्या असून लागवड केलेल्या क्षेत्रातील पिकांची उगवण समाधानकारक आहे.

उर्वरित क्षेत्रामध्येही लागवडीची कामे अंतिम टप्प्यात असून हवामान अनुकूल राहिल्यास येत्या काही दिवसांत शंभर टक्के लागवड पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मौजे-तिसले येथील शेतकरी आदेश भोईर यांच्या शेतावर चारसूत्री पद्धतीने भात लागवड सहाय्यक कृषी अधिकारी मनोज कदम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.

शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या मार्गदर्शनानुसार शिफारशीनुसार खतांचा वापर करावा, अनावश्यक रासायनिक फवारण्या टाळाव्यात आणि हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन कृषी कामांचे नियोजन करावे. वेळोवेळी कृषी विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या सूचना व सल्ल्यांचे पालन केल्यास भात पिकाचे उत्पादन व गुणवत्ता वाढण्यास निश्चितच मदत होईल. यंदा मुरुड-जंजिरा तालुक्यात भाताचे चांगले उत्पादन होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

आवश्यक तेवढाच पाण्याचा साठा ठेवावा

कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांना सुधारित भात लागवड तंत्रज्ञान, संतुलित खत व्यवस्थापन, तण नियंत्रण, कीड व रोगांचे एकात्मिक व्यवस्थापन तसेच नैसर्गिक शेतीविषयक मार्गदर्शन नियमितपणे करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनी शेतामध्ये आवश्यक तेवढाच पाण्याचा साठा ठेवावा, पिकांची नियमित पाहणी करावी तसेच कीड किंवा रोगाची लक्षणे आढळल्यास तात्काळ कृषी विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT