रायगडात नगरपरिषद निवडणूक प्रचाराचा वाढला वेग pudhari [photo
रायगड

Raigad municipal election : रायगडात नगरपरिषद निवडणूक प्रचाराचा वाढला वेग

प्रमुख पक्षांच्या अधिकृत उमेदवारांकडे चिन्ह मात्र अपक्षांची गोची; बुधवारी होणार अधिकृत चिन्हवाटप

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग ः सुवर्णा दिवेकर

रायगड जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांच्या निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग येत आहे. सभा, बैठका, रॅल्यांमुळे शहरी भागात राजकीय वातावरण तापले आहे. युती, आघाडीसह सर्व राजकीय पक्ष, अपक्ष मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत आहेत. जिल्ह्यात राजकीय पक्षांचे उमेदवारांकडे अधिकृत निवडणूक चिन्ह असल्याने त्यांचा निवडणूक प्रचार जोरदार सुरू आहे. मात्र चिन्ह वाटप झालेले नसल्याने अपक्ष उमेदवारांची चांगलीच गोची झाली आहे. बुधवारी चिन्हवाटप होणार आहे.

रायगड जिल्ह्यातील दहा नगर परिषदांच्या आगामी निवडणुकीत कोणत्याही पक्षाने, कोणत्याही ठिकाणी अपील न केल्याने निवडणूक प्रक्रियेत अनपेक्षित शांतता पाहायला मिळाली आहे. उमेदवारी मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता सर्वांची नजर लागली आहे ती चिन्ह वाटपावर, ज्यातून प्रत्यक्ष लढतींचे स्वरूप अधिक स्पष्ट होणार आहे.

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्वतंत्र, प्रादेशिक तसेच राष्ट्रीय पक्षांचे उमेदवार मैदानात आहेत. मात्र या वेळी कोणत्याही उमेदवारांनी अर्जांविरोधात अपील न केल्यामुळे निवडणूक आयोगाकडे आक्षेप-तक्रारींची गर्दी नव्हती. त्यामुळे प्राथमिक प्रक्रिया विलंब न होता सुरळीतपणे पूर्ण झाली.

दरम्यान, राष्ट्रीय पक्षांकडून अधिकृत चिन्हावर निवडणूक लढवणारे उमेदवार मात्र आधीच सक्रिय झाले आहेत. कारण त्यांच्या अर्जासोबतच त्यांचे चिन्ह निश्चित असल्याने त्यांनी जाहीर सभा, घरदार भेटी, मतदार संपर्क आणि सोशल मीडिया मोहिमेला वेग दिला आहे.

याउलट, प्रादेशिक पक्ष आणि अपक्ष उमेदवारांकडे अंतिम चिन्ह निश्चित होईपर्यंत प्रचाराला स्पष्ट दिशा देता येत नाही. त्यामुळे या गटांमध्ये काही प्रमाणात संभ्रम आणि प्रतीक्षेचे वातावरण आहे. चिन्ह मिळाल्यानंतरच पोस्टर, बॅनर, मतपत्रिका नियोजन आणि प्रचार साहित्याची अंतिम तयारी करता येणार आहे.

राजकीय तज्ज्ञांच्या मते, या शांत निवडणूक प्रक्रियेमुळे स्थानिक संघर्षांना आळा बसला आहे, परंतु चिन्हवाटपानंतर काही ठिकाणी त्रिकोणी किंवा चौरंगी लढती अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे.

रायगड जिल्ह्यातील मतदारसंघांचे राजकीय समीकरण लक्षात घेता, या निवडणुकीत काही ठिकाणी राष्ट्रीय पक्षांची झुंज प्रबळ राहील तर काही नगर परिषदमध्ये स्थानिक गट, अपक्ष किंवा प्रादेशिक पक्षांचा प्रभाव निर्णायक ठरू शकतो.

165 चिन्हांचा समावेश

नगर परिषद निवडणुकीमध्ये पुरातन वस्तूसोबत अत्याधुनिक वस्तूंचे चिन्ह हे रंजकदार ठरणार आहे. जातु, रोबोट, ग्रामोफोन सीसीटीव्ही ढोबळी मिरची, लसून, मका, सफरचंद, पेरू, अननस अश्या वेगवेगळ्या चिन्हांचा समावेश आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नगर परिषद निवडणुकीमध्ये सुमारे 165 चिन्हांचा समावेश आहे. आता फक्त राजकीय पक्ष, उमेदवार आणि मतदार यांची नजर आहे ती निवडणूक आयोगाकडून होणाऱ्या चिन्ह वाटपाच्या घोषणेवर, जी संपूर्ण निवडणूक चित्र स्पष्ट करणार आहे.

चिन्हवाटपानंतर प्रचाराला मिळणार चार दिवस

प्रादेशिक पक्ष आणि अपक्ष उमेदवारांकडे अंतिम चिन्ह निश्चित होईपर्यंत प्रचाराला स्पष्ट दिशा देता येत नाही. चिन्ह मिळाल्यानंतरच पोस्टर, बॅनर, मतपत्रिका नियोजन आणि प्रचार साहित्याची अंतिम तयारी करता येणार आहे. निवडणूक चिन्ह वाटप येते 26 नोव्हेंबर रोजी होणार आहे. मतदान 2 डिसेंबर रोजी आहे. त्यामुळे निवडणूक चिन्हाच्या प्रचाराला फक्त चारच दिवस मिळणार आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT