मुंबई आणि पुण्याला जोडणार्‍या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम 96 टक्केपूर्ण झाले  Pudhari News Network
रायगड

रायगड : मुंबई-पुण्याला जोडणारा मिसिंग लिंक प्रकल्प 96 टक्के पूर्ण

13 कि.मी. लांबीच्या मार्गामुळे मुंबई-पुणे अंतर 5.7 कि.मी.ने कमी

पुढारी वृत्तसेवा

रायगड : मुंबई आणि पुण्याला जोडणार्‍या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचा (एमएसआरडीसी) मिसिंग लिंक प्रकल्पाचे काम 96 टक्केपूर्ण झाले आहे. या रस्त्याचे उद्घाटन सप्टेंबर 2025 मध्ये होईल, अशी नवीन अंतिम डेडलाईन एमएसआरडीसीने निश्चित केली आहे.

तथापि, 13 कि.मी. लांबीच्या या मार्गामुळे मुंबई-पुणे अंतर 5.7 कि.मी.ने कमी होईल. तसेच प्रवासाचा वेळ सुमारे 30 मिनिटांनी कमी होणार आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर नवीन वाहनांना 120 कि.मी. प्रतितास वेग ठेवण्यास परवानगी मिळू शकणार आहे.

6,600 कोटी रुपयांच्या या मिसिंग लिंक प्रकल्पाला मार्च 2024 ते जानेवारी 2025 आणि नंतर मार्च 2025 पर्यंत एकूण तीन वेळा मुदतवाढ देण्यात आली होती. त्यानंतर आता सप्टेंबर 2025 अशी अंतिम डेडलाईन देण्यात आली आहे. दरम्यान, या प्रकल्पाच्या शिल्लक 4 टक्के कामाला गती देण्यात येत असली, तरी लोणावळ्याजवळील प्रकल्पाच्या भागातील काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करणे आव्हानात्मक असल्याचे एमएसआरडीसीच्या सूत्रांनी म्हटले आहे.

प्रकल्पाची वैशिष्ट्ये अशी...

  • मिसिंग लिंक प्रकल्प मूल्य 6,600 कोटी रुपये

  • मिसिंग लिंक प्रकल्पाची लांबी 13 किलोमीटर

  • केबल-स्टेड पुलाची प्रथमच उभारणी केली जात आहे

  • मुंबई-पुणे अंतर 5.7 कि.मी.ने कमी होणार

  • प्रवासाच्या वेळेत सुमारे 30 मिनिटांची बचत

  • प्रकल्प सुरू झाल्यावर ताशी 120 कि.मी. वेगास परवानगी

  • पावसाळ्यात दरडी कोसळण्यामुळे वाहतूक ठप्प होणार नाही

180 मीटर उंचीवरील केबल-स्टेड पूल बांधण्याचे आव्हान

बोगदे आणि पहिला मार्ग तयार झाला असला, तरी दुसर्‍या मार्गाचे बांधकाम सुरू आहे. हा भाग विशेषतः दरीवरून पसरलेला असल्याने आव्हानात्मक आहे, असे एमएसआरडीसीच्या अधिकार्‍यांनी म्हटले आहे. खंडाळा खोर्‍यापासून 180 मीटर उंचीवर असलेला केबल-स्टेड पूल, अभियांत्रिकी क्षेत्रात मोठे आव्हान निर्माण करतो. येत्या पावसाळ्यात या मार्गावरील प्रगती आणखी लांबू शकते, असा अंदाज अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी व्हायाडक्ट-बोगद्याचा वापर

सद्यस्थितीतील नियमित वाहतुकीवर कोणत्याही प्रकारे परिणाम न करता काम करण्यात येत आहे. दुसर्‍या व्हायाडक्ट कामाच्या ठिकाणी जाण्यासाठी पूर्ण झालेल्या व्हायाडक्ट आणि बोगद्याचा वापर करण्यात येत आहे. या प्रकल्पात लोणावळा-खंडाळा विभागात टायगर व्हॅलीच्या वर जाणारा 840 मीटरचा व्हायाडक्ट, 1.75 किमीचा बोगदा आणि 650 मीटरचा केबल-स्टेड पूल समाविष्ट आहे. हा मार्ग आणखी 8.9 किमीच्या बोगद्यातून जातो, ज्याचा काही भाग लोणावळा तलावाच्या खाली 170 फूट अंतरावर असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT