Maharashtra local body elections
माथेरान : माथेरान नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी मंगळवारी (दि.२) सकाळी मतदानाला सुरुवात झाली. दरम्यान, सकाळी १० च्या सुमारास प्रभाग क्र.१० मधील लेक व्ह्यू हॉटेल जवळ प्रकाश गुप्ता या व्यक्तीला ५ लाखांच्या रोकडसह निवडणूक यंत्रणेच्या भरारी पथकाने ताब्यात घेतले.
प्रकाश गुप्ता यांची चौकशी केली असता तो हॉटेलचा कर्मचारी असून हॉटेलच्या कर्मचाऱ्यांच्या पगाराची ही रक्कम असल्याचे त्याने सांगितले. दरम्यान, पाच लाख रुपयांची ही रक्कम सध्या जप्त करण्यात आली आहे. चौकशी अंती पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक यंत्रणेच्या सुत्रांनी दिली. दरम्यान प्रकाश गुप्ता याला अटक करण्यात आलेली नाही.
माथेरान मधील या प्रभाग क्रमांक १० मध्ये नगरसेवक पदाकरिता ठाकरे शिवसेनेचे प्रसाद सावंत आणि शिंदे सेनेचे किशोऱ मोरे यांच्यात लढत आहे. तर थेट नगराध्यक्ष पदाकरिता राष्ट्रवादी काँग्रेसचे अजय सावंत आणि शिंदे शिवसेनेचे चंद्रकांत चौधरी यांच्यामध्ये लढत आहे. भरारी पथकाने ५ लाख रुपयांची रोकड पकडल्याने शहरात खळबळ उडाली आहे.