रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुका आज घरकुल योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्यात अग्रेसर ठरत आहे.  Pudhari
रायगड

Raigad Mangaon News | घरकुलांमुळे उघडली लाभार्थ्यांच्या स्वप्नांची दारे !

उत्कृष्ट आणि गुणवत्तापूर्ण बांधकामामुळे माणगाव तालुका राज्यात ठरतोय अग्रेसर

पुढारी वृत्तसेवा
माणगाव : कमलाकर होवाळ

रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुका आज घरकुल योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्यात अग्रेसर ठरत आहे. या तालुक्यातील ग्रामविकासाचे हे एक उत्तम उदाहरण आहे. राज्य शासनाने प्रधानमंत्री जनमन आवास योजना व रामाई घरकुल योजना यांसारख्या योजनांद्वारे गोरगरिबांना निवारा मिळवून देण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली आहेत. त्याचा परिणाम माणगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये दिसून येत आहे. तालुक्यात 74 ग्रामपंचायती असून तालुक्यात घरकुलासाठी 2053 लाभार्थांचा सर्व्हे करण्यात आला. त्यापैकी 1918 पात्र लाभार्थी ठरविण्यात आले. तर 135 ऑनलाईन अपात्र लाभार्थी ठरविण्यात आले. यामधून 1379 घरकुलाला मंजुरी देण्यात आली. पैकी 329 घरकुले बांधून पूर्ण झाली आहेत. उर्वरित 1050 घरकुले प्रगती पथावर आहेत. त्यामुळे रायगड जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात माणगाव तालुका घरकुल योजनेत अग्रेसर ठरला असून या घरकुलांमुळे अनेकांच्या स्वप्नांची दारे उघडली आहेत.

घरकुल योजनां अंतर्गत गरजू कुटुंबांना त्यांच्या स्वप्नातील घर बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य, वेळोवेळी केलेले तांत्रिक मार्गदर्शन आणि संपूर्ण पाठबळ यामुळे केवळ कुटुंबाला निवारा मिळत नाही, तर त्यांच्या जीवनमानात सामाजिक फार मोठा बदल घडत आहे. कामांची गुणवत्ता व पारदर्शकता ही या कामाची कसोटी होती. माणगाव तालुक्यातील घरकुल योजनेच्या अंमलबजावणीत गुणवत्ता हा महत्त्वाचा धागा पकडून प्रत्येक घरकुल बांधकामामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर, दर्जेदार बांधकाम, साहित्य, आणि योग्य मोजणीसह कामाची अंमलबजावणी झाल्याचे चित्र दिसते. स्थानिक प्रशासनाने या शासनाच्या घरकुल योजने मध्ये पारदर्शकतेसाठी विशेष प्रयत्न केले आहेत. लाभार्थ्यांच्या निवड प्रक्रियेपासून काम पूर्ण होईपर्यंत सर्व कामे डिजिटल पद्धतीने नोंदवली गेली असुन लाभार्थ्यांना प्रोत्साहन देऊन त्यांचा यात मोठा सहभाग वाढवत सकारात्मक दृष्टिकोन निर्माण केला त्यामुळेच या लाभार्थ्यांनी बांधलेले स्वतःचे घर सुरेख आणि दर्जेदार आहे.

माणगाव पंचायत समितीचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी संदीप जठार यांनी लोकसहभाग आणि स्थानिक रोजगाराच्या पलीकडे जाऊन ’ आपलं घर सुंदर घर ’ ही संकल्पना या तालुक्यात राबवत घरकुल योजना केवळ निवार्‍याचे साधन नाही, तर ती तालुक्यातील लोकांना रोजगार देणारी संधीही ठरली आहे. माणगाव तालुक्यातील घरकुल योजनेमध्ये ठेकेदारा मार्फत न बांधता, संबंधित लाभार्थ्यांनी स्वतःचं घर स्वतःच बांधायचं असा कानमंत्र देत ही घरे सहभागातून उभी केली. लाभार्थ्यांना बांधकाम साहित्य खरेदीत येणार्‍या अडचणी कौशल्याने सोडवत, त्यांना बांधकाम साहित्य वेळोवेळी पुरविण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. आज माणगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये हजारो गरजू कुटुंबे कच्च्या घरांमध्ये राहतात. पावसाळ्यात गळणारी झोपडी, उन्हाळ्यात तापणारी कौलारू टिनाची छप्परे किंवा वादळात उडणार्‍या झोपड्यांपासून मुक्तता झाल्याने त्यांच्या जीवनशैलीत सकारात्मक बदल घडविण्यासाठी माणगाव पंचायत समितीने टाकलेलं हे एक सकारात्मक पाऊल आहे. या घरांमुळे मुलांच्या शिक्षणासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे.

माणगाव तालुका आता घरकुल योजनांच्या माध्यमातून राज्यासह अन्य तालुक्यांसाठी आदर्श ठरत आहे. या योजनेमुळे केवळ माणगाव नव्हे, तर संपूर्ण राज्याचा विकास साधता येईल, अशी स्थानिक लोकांची भावना आहे. माणगाव तालुक्यातील घरकुल योजनांची ही यशस्वी वाटचाल माणगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री. जठार यांनी केलेले योग्य नियोजन तसेच ग्रामपंचायत मधील सर्व ग्रामविकास अधिकारी, विस्ताराधिकारी, कर्मचारी यांना विश्वासात घेऊन शासकीय वेळे व्यतिरिक्त सुट्टीच्या दिवशीही लोकसेवकांची जबाबदारीचे धडे त्यांच्यात रुजवत लाभार्थी ग्रामस्थांच्या लोकसभागातून आणि प्रशासनाचा पारदर्शक दृष्टिकोन यामुळे अनेकांच्या स्वप्नातली घरे पूर्ण झाली त्याचा आनंद आजही लाभार्थी कुटुंबाच्या चेहर्‍यावर दिसून येत आहे.

जिल्ह्यात 706 घरकुले

राज्यात सोळा जिल्ह्यामध्ये शासनाच्या आकडेवारी नुसार बांधण्यात आलेल्या रायगड जिल्ह्यात 706 घरकुलात पुढे आहे. तर पालघर 650, यवतमाळ 245, नांदेड 128, नाशिक 96, गडचिरोली 83, रत्नागिरी 65, ठाणे 48, सातारा 21, अमरावती 20, पुणे 11, वर्धा 11, चंद्रपूर 10, अहमदनगर 3, सिंधुदुर्ग 0, कोल्हापूर 0.

माणगाव तालुक्यात 329 घरे

जिल्ह्यात एकूण 706 घरकुले बांधून पूर्ण झाली. त्यांपैकी माणगाव 329, सुधागड 62, मुरुड 48, तळा 45, कर्जत 43, अलिबाग 31, पनवेल 31, पेण 22, रोहा 21, महाड 21, पोलादपूर 19, श्रीवर्धन 13, उरण 11 म्हसळा 7, खालापूर 3.

शासनाची प्रधानमंत्री जनमन आवास योजना हि आदीवासी वंचित गरजू लाभार्थापर्यत पोहोचवून कमी वेळात लाभार्थांना लाभ मिळवून देण्यासाठी जिल्ह्यात सकारात्मक दृष्टीकोनातून काम चालू आहे. त्यामुळे लाभार्थांना निवार्‍याची सोय झाली आहे. माणगाव पं. स. गटविकास अधिकारी व ग्रामविकास अधिकार्‍यांनी उत्तम नियोजन करून हि योजना प्रभावी राबविली. त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे अन्य तालुक्यात हि सकारात्मक दृष्टीकोन ठेवून करण्याचे काम सुरु आहे. या योजनेमुळे आदिवासींच्या सर्वांगीण उन्नतीत होईल
प्रियदर्शनी मोरे, प्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणा रायगड

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT