माणगाव: माणगावहून जामखेडकडे जाणाऱ्या एसटी बसला आज (दि.१४) सकाळी साडेनऊच्या सुमारास अपघात झाला. माणगाव-पुणे मार्गावरील कोस्ते बुद्रुक गावाजवळ एका तीव्र वळणावर चालकाने समोरून येणाऱ्या दुसऱ्या बसला वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र यात बस रस्त्याच्या कडेला घसरून कलंडली. सुदैवाने, बसमधील २९ प्रवासी थोडक्यात बचावले असून मोठी जीवितहानी टळली आहे.
माणगाव आगाराची बस (MH-13 CU-6937) सकाळी प्रवाशांना घेऊन जामखेडकडे निघाली होती. कोस्ते बुद्रुक गावाजवळच्या वळणावर समोरून पुणे-माणगाव बस येत असल्याचे पाहून चालक बाळासाहेब जोडगे यांनी बस रस्त्याच्या कडेला घेतली. मात्र, साईडपट्टीवर बस घसरल्याने त्यांचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्याच्या कडेला कलंडली. अपघात होताच बसच्या काचा फुटल्या आणि प्रवाशांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण पसरले होते.
या अपघातात चालकासह सहा जण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने माणगाव उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. बाळासाहेब सखाराम जोडगे (चालक), सुनील प्रकाश केवड (वाहक), दत्तू सुतार (वय ८६, रा. कोस्ते खुर्द), बाबू शिंदे (वय ७०, रा. कोस्ते खुर्द), विकास जाधव (वय ७२, रा. म्हसळा), विठ्ठल ढोकळ (रा. महाड) अशी जखमींची नावे असून, प्रशासन आणि ग्रामस्थ मदतीला धावले.
घटनेची माहिती मिळताच एसटी आगार व्यवस्थापक छाया कोळी, उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी, माणगाव आणि निजामपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तात्काळ मार्गावरील वाहतूक सुरळीत केली. त्याचवेळी स्थानिक ग्रामस्थांनीही पुढे येत जखमींना बसमधून बाहेर काढण्यास आणि मदतकार्यात मोलाचा हातभार लावला. या अपघाताची नोंद माणगाव पोलिसांत करण्यात आली असून, अपघाताच्या नेमक्या कारणांचा अधिक तपास सुरू आहे.