अलिबाग : सुवर्णा दिवेकर
अलिबाग तालुक्यांतील मांडवा व मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया या सागरी जलमार्गावरील पावसाळ्यात बंद असणारी प्रवासी बोट वाहतूक 1 सप्टेंबरपासून सुरु होत असते. मात्र यंदा अद्यापही पाऊस रेंगाळल्याने तसेच हवामानाच्या लहरीपणामुळे जलवाहतूक नियमीत व सुरळीतपणे सुरु झाली नसल्याची माहिती पीएनपी कॅटमरान कंपनीकडून देण्यात आली.
सद्यस्थितीत पीएनपी कॅटमरान सेवा सुरु असली तरी हवामानानुसार कॅटमरान सोडण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रवासी कॅटमरानने जाण्यास इच्छुक आहेत. मात्र गेले 2 ते 3 दिवस सकाळी हवामान खराब असल्याने बोटी सोडल्या नव्हत्या. पीएनपी, मालदार, अजंठा, अपोलो या कंपन्यांच्या बोटी मांडवा ते गेट वे जलमार्गावर प्रवासी सेवा देतात. सध्या केवळ पीएनपी कॅटमरान कंपनीची सेवा सुरु आहे.
वेळेची बचत करणारा आणि पर्यटनाचा आंनद देणारा प्रवास म्हणून मुंबई गेटवे ते मांडवा या प्रवासाला उत्तम प्रतिसाद आहे. मुंबई ते मांडवा हे केवळ 40 मिनिटांचे सागरी अंतर पार करून पर्यटक अलिबागला पोहोचतात. गेली अनेक वर्षे सुरळीत सुरू असलेल्या या सेवेची भुरळ पर्यटक आणि प्रवाशांना पडली आहे. दरवर्षी 20 लाखाहून अधिक प्रवासी या सेवेचा लाभ घेतात.
यातून महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाला दोन ते अडीच कोटी रूपयांचा महसूल प्राप्त होत असतो. मुंबई ते अलिबाग हा रस्ता प्रवास तीन ते साडेतीन तासांचा आहे. शिवाय या प्रवासात वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. त्यातच यंदा वडखळ ते अलिबाग दरम्यानच्या रस्त्याची अत्यंत गंभीर दुरवस्था झाली आहे. अशावेळी गेटवे ते मांडवा हा जलमार्गाचा पर्याय अतिशय किफायतशीर ठरतो आहे.
वर्षातील जवळपास 9 महिने सुरू राहणारी ही जलवाहतूक सेवा पावसाळयात समुद्र खवळलेला असल्याने तीन ते साडेतीन महिने बंद ठेवली जाते. पावसाळ्यात बंद राहणार्या या जलवाहतुकीचा परिणाम अलिबाग आणि रायगडमधील पर्यटनावरही होतो. मुंबईकरांची मांडवा किनार्याला पर्यटनासाठी पसंती असते. मांडवा इथं पर्यटनाच्या दृष्टीनं अनेक गोष्टींचा विकास झाला आहे.
सध्या केवळ पीएनपी कॅटमरान बोट सेवा सुरु झाली आहे. हवामानाचा अंदाज घेऊन ही वाहतूक करण्यात येत आहे. पीएनपी कॅटमरान फेरी बोट सेवेच्या सकाळी 8.10 व10.10 वाजता आणि दुपारी 2.10 व 4.10 वाजता अशा प्रवासी फेर्या सुरु आहेत.
पर्यटकांबरोबरच दररोज मुंबईला ये-जा करणारे नोकरदार या सागरी मार्गाचा वापर करतात. मुंबई ते अलिबाग असा रस्त्याने प्रवास करण्याऐवजी अतिशय सुलभ आणि वेळेची बचत करणार्या या जलमार्गाचा अवलंब करतात. बोटीच्या सभोवती फिरणा़र्या सीगल पक्ष्यांशी खेळत सागरी पर्यटनाचा आनंद घेत पर्यटक अलिबागला हसत खेळत पोहोचतात. कामानिमित्त मुंबईला जाणारे अलिबागकर देखील या जलप्रवासाला प्राधान्य देतात.