अलिबाग ः अतुल गुळवणी
रायगडसह संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या पाच दिवसांपासून मोसमी पावसाने दाणादाण उडवून दिलेली आहे. मघा नक्षत्रात पडत असलेल्या पावसाचा जोर हा अजून आणखी आठवडाभर कायम राहण्याचा अंदाज पंचांगशास्त्रातून व्यक्त केला जात आहे. मघा नक्षत्रात पडणार्या पावसाला पंचांगशास्त्रात ‘सासुचा पाऊस’ असे संबोधले जाते.त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावरच सासुने कहर केला असे म्हणण्याची वेळ सर्वांवर आली आहे.
मघा नक्षत्राला 16 ऑगस्टपासून प्रारंभ झाला असून,या नक्षत्राचा कालावधी 30 ऑगस्टपर्यंत राहणार आहे.वरुणराजा बेडकावर स्वार होऊन जोरदारपणे बरसण्यासाठी दाखल झालेला आहे.त्याची प्रचिती गेल्या पाच दिवसापासून महाराष्ट्र अनुभवत आहे. मध्यंतरी गायब झालेल्या पावसाने जुलैमध्ये पडलेली तुट गेल्या चार दिवसात पूर्णपणे भरुन काढल्याचे चित्र रायगडासह महाराष्ट्रात दिसत आहे. 16 ऑगस्टपासून सुरु झालेल्या पावसाचा जोर पाच दिवसानंतरही अखंडित राहिलेला आहे. गोकुळाष्टमी,दहीहंडीला वरुणराजाने जोरदार पर्जन्यवृष्टी केली आहे.आताही त्याने रायगडात अनेक ठिकाणी द्विशतकी सलामी ठोकली आहे.
पुढील पाच दिवस अतिवृष्टी?
पंचांगात व्यक्त केलेल्या अंदाजानुसार 20 ते 25 ऑगस्टदरम्यान राज्यात सर्वत्र अतिवृष्टी होण्याचा संभव व्यक्त केला जात आहे.यामुळे सर्वत्र सावधानतेचा इशाराही देण्यात आलेला आहे.आधीच मुसळधार पावसाने जोरदार बॅटिंग केलेली असल्याने धरणे तुडूंब भरुन वाहू लागलेली आहेत.त्यात नद्यांच्या पाण्याच्या पातळ्याही वाढत असल्याने पुराचा धोका अनेक ठिकाणी जाणवत आहे.
गणेश मंडळाची धास्ती वाढली
राज्यात गणेशोत्सवास 27 ऑगस्टपासून प्रारंभ होत आहे.यामुळे ऐन गणेशोत्सवातही पावसाची अवकृपा राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.दि. 26,27 ऑगस्टला पावसाचा जोर कमी राहणार असला तरी 28 ते 30 ऑगस्ट दरम्यान पाऊस पुन्हा जोर धरेल,असेही पंचांगातून नमूद करण्यात आले आहे.त्यामुळे गणेशभक्तांना बाप्पाचे आगमन भर पावसातून आणावे लागणार हे नक्की.तयारी करतानाही पावसाची जोरकस हजेरी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.