महाड : दारूबंदी भरारी पथक मुंबई यांना मिळालेल्या माहितीप्रमाणे या अधिकाऱ्याने महाड तालुक्यातील मुंबई गोवा महामार्गावर सापळा रचून दारु जप्त केली. दासगाव हद्दीत गावातील एका ट्रकला थांबून कसून चौकशी करत त्या ट्रकमध्ये एक कोटी साठ लाख रुपयाची विनापरवाना गोव्यातील दारू जप्त केली आहे. मुंबई गोवा महामार्गावर मागील काही दिवसात दारूबंदी विभागाकडून करण्यात आलेली सर्वात मोठी कारवाई मानण्यात येत आहे.
दारूबंदी विभाग भरारी पथक मुंबई यांना गोवा ते मुंबई विना परवाना दारू घेऊन एक ट्रक जाणार आहे अशी गुप्त माहिती मिळाली या माहितीच्या आधारावर यांनी महाड तालुका हद्दीत मुंबई गोवा महामार्गावर सापळा रचला आणि आर जी -३६ जी बी १२७७ या ट्रकचा महाड वरून पाठलाग करत मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दासगाव गाव हद्दीत थांबवून कसून चौकशी केली असता या ट्रकमध्ये अंदाजे १३०० रॉयल सिलेक्ट या दारूचे बॉक्स सापडले.
या ट्रकचा चालकाला ट्रकसह ताब्यात घेण्यात आले असून महाड मधील दारूबंदी कार्यालय येथे पुढील कारवाईसाठी नेण्यात आले असल्याची माहिती या भरारी पथकाचे उपनिरीक्षक शहाजी गायकवाड यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी दिली आहे.
गोवा राज्यातून हा ट्रक मुंबई येथे जात असल्याची माहिती भरारी पथकाचे उपनिरीक्षक शहाजी गायकवाड यांनी दिली असून महाड परिसरातील ही त्यांची पहिली तर या वर्षातील दुसरी कारवाई असल्याचे त्यांनी नमूद केले.
या कारवाईमध्ये भरारी पथकाचे पोलीस उप निरीक्षक शहाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक संतोष गोंदकर, पोलीस कॉन्स्टेबल अमोल चिलघर, पोलीस कॉन्स्टेबल चौगुले यांचा समावेश आहे. हा ट्रक ताब्यात घेतल्यानंतर दारूबंदी कार्यालय महाड या ठिकाणी नेण्यात आले आहे त्या ठिकाणी संपूर्ण तपासणी नंतर या ट्रक मध्ये दारूचे खोके नक्की किती आहेत आणि याची किंमत किती आहे हे निश्चित होईल.
मागील काही महिन्यात दारूबंदी विभागाकडून महाड परिसरामध्ये करण्यात आलेली सर्वात मोठी कारवाई मानण्यात येत आहे. संबंधित चालक व अन्य इसमांना आज महाड न्यायालयात हजर करण्यात येईल अशी माहिती उपनिरीक्षक शहाजी गायकवाड यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना दिली.