अलिबाग ः येत्या ऑक्टोबर,नोव्हेेंबरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची लगीनघाई उडणागर हे आता निश्चित झाल्याने रायगडात सर्वच राजकीय पक्षांसह इच्छुकांच्या आशा पल्लवीत झालेल्या आहेत.आता सार्यानाच वेध लागलेत ते प्रभाग,गट,गण,वॉर्डांच्या आरक्षणाकडे त्यावर इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू होणार आहे.सप्टेंबरपर्यंत ही रचना पूर्ण केली जाणार आहे.त्यानंतरच खर्या अर्थाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक हालचालींना वेग येणार आहे.
रायगडात जिल्हा परिषदेसह 15 पंचायत समित्या,पनवेल महापालिका आणि 10 नगरपालिकांच्या निवडणुका तब्बत चार वर्षानी होत आहेत.चार वर्षात प्रशासकीय राजवटीने राजकीय पक्ष थंडावलेले होते.पण आता सर्वोच्च न्यायालयानेच चार महिन्यात निवडणुका घ्या,असे फर्मान सोडल्याने प्रशासन शासकीय तयारीला लागलेले आहे. तर राजकीय पक्ष राजकीय आडाखे बांधू लागलेले आहेत.
मावळत्या जिल्हा परिषदेत 67 गट होते तर 157 च्या आसपास पंचायत समित्यांचे गण होते.आता नवीन रचनेत हे गट,गण किती ठरतात याकडे सर्वार्ंच्या नजरा लागलेल्या आहे.अशीच स्थिती पनवेल महापालिकेची आहे.मावळत्या सभागृहात 57 नगरसेवक होते.त्यापैकी कितीजणाचे प्रभाग नव्या रचनेत राहतात हे पहावे लागणार आहे.सरकारने नव्या रचनेत प्रभागातून दोन नगरसेवक निवडूण द्यायचे अशी योजना आखली आहे.
वाढलेले मतदार यांचही संख्या लक्षात घेत नवीन रचना होताना सर्वार्ंनाच धक्का बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे जोपर्यंत आरक्षणाची सोडत जाहीर होत नाही तोपर्यंत इच्छुकांची धाकधूक आणखी वाढण्याची शक्यता आहेत.जे हुकमी आहेत अशा इच्छुकांनी मात्र आरक्षण काहीही पडले तरी निवडणूक लढवून जिंकायचीच असा पण केलेला असल्याने ते आतापासूनच कामाला लागलेले आहेत.असाच प्रकार नगरपालिकांमध्ये होत असल्याचे दिसत आहे.नगरपालिकांमध्ये नगराध्यक्षांची निवड ही थेट जनतेमधून होणार असल्याने नगराध्यक्षपदाचे आरक्षण शिवाय वॉर्डांचे आरक्षण यावरही राजकीय घडामोडी ठरणार आहेत.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ऑक्टोबरमध्ये होणे अपेक्षित आहेत.यामुळे या काळात होणार्या सण,उत्सवांना विशेष महत्व प्राप्त होणार आहे.विशेष करुन श्रावणातील गोकुळाष्टमी, दही हंडी, नारळी पौर्णिमा, गणेशोत्सव,नवरात्रौत्सव,दसरा आदी सणांना राजकीय पक्ष विशेष महत्व देऊन युवा मंडळांना आपल्याकडे खेचण्याचा कसोशीने प्रयत्न करतील.इच्छुकही मंडळांकडे विशेष लक्ष देतील.यामुळे मंडळांच्या कार्यकर्त्यांची दिवाळी होणार हे नक्की.
रायगडात या निवडणुका महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढणार की स्वतंत्रपणे लढविल्या जाणार याबाबत उत्सुकता लागली आहे. शिवसेना,राष्ट्रवादीतील वाढलेला दुरावा यामुळे महायुतीला रायगडात तडे गेलेले आहेत.शिवसेनेने तर महायुतीत राष्ट्रवादी नकोच अशीच भूमिका घेतली आहे.अर्थात हे स्थानिक स्तरावर जाहीर झाले असले तरी वरिष्ठ पातळीवरून जर काही हालचाली झाल्या तर मात्र महायुतीला एकत्रपणे लढावे लागेल.पण ते लढताना परस्परांचा काटा काढण्यासाठी पाडापाडीचे राजकारणही रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही.