Missing Minor Girl Found
कोलाड : कोलाड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गौळवाडी येथील एका आदिवासी समाजातील अल्पवयीन मुलीचा पोलिसांनी अवघ्या काही तासांत शोध लावून तिला सुरक्षितपणे कुटुंबियांच्या ताब्यात दिले. या कामगिरीबद्दल कोलाड परिसरात पोलिसांचे कौतुक होत आहे.
मोबाईल वापरण्याच्या कारणावरून आईने रागावल्यानंतर संबंधित मुलगी रात्रीच्या वेळी घरातून निघून गेली होती. याबाबत तिच्या आईने कोलाड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक भारत फारणे यांनी तत्काळ हालचाली सुरू करत शोध पथकाची नियुक्ती केली.
सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नरेश पाटील, पोलीस हवालदार भास्कर पाटील, वसंत सिद यांच्या पथकाने गुप्त बातमीदार आणि पोलीस मित्रांच्या मदतीने शोधमोहीम राबवली. सुतारवाडी हद्दीतील माहितीच्या आधारे पथकाने दणकी आदिवासी वाडी, पाथर शेत परिसरातील धरणाजवळील जंगल भागात शोध घेतला.
तीन ते चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर मुलगी सापडली. पोलिसांनी तिची चौकशी करून समुपदेशन केले आणि नंतर सुरक्षितपणे आईच्या ताब्यात दिले.
अल्पावधीत, कोणतीही ठोस माहिती नसताना केवळ बातमीदारांच्या मदतीने जंगल परिसरात शोध घेऊन मुलीचा शोध लावल्याने कोलाड पोलिसांच्या या कार्यतत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे.