मुरुड जंजिरा (रायगड) : सुधीर नाझरे
मुरुड तालुक्यातील राजपुरी ग्रामपंचायत हद्दीतील खोरा बंदर अंतर्गत प्रवासी जेट्टीचे काम पूर्ण झाले परंतु जेट्टी किल्ल्यात जाणाऱ्या पर्यटकांसाठी नवीन बांधली आहे मात्र अजून उदघाटन झाले नाही तरी जेट्टीच्या प्रवासी उतरण्याच्या पायरीचे स्लॅब फुटले आहेत. हे फुटलेले स्लॅब कधीही पडतील व अपघात होण्याची शक्यता आहे. जाणारा किल्ल्यात पर्यटकांचा जीव धोक्यात पडण्यापेक्षा उद्घाटनाआधी जेट्टीची पूर्ण दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.
मुरुड खोरा बंदर येथील मुख्य रस्त्यापासून ते खोरा बंदर कार्यालय येथपर्यंत अंतर्गत रस्त्यांचे काम तसेच जेट्टी परिसरातील अंतर्गत रस्त्यांच्या कामांकरिता शासनाने करोडो रुपये खर्च करुन ठेकेदारांकडून काम पूर्ण करुन घेतले. परंतु हे काम सहा महिनेही टिकू शकले नाही. रस्त्यामधून सिमेंटचा भुसा दगडे बाहेर येऊन पूर्णतः धुपुन गेला आणि पुन्हा रस्त्याची दुरवस्था झाली. सदर कामाची वस्तुस्थिती पाहता संबंधित ठेकेदारांनी फक्त पैसे लाटण्याच्या उद्देशाने हे काम केलेले आहे. सदरचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले असून रस्त्यावरून चालत असताना बाजुने एखादी बाईक जरी गेली तरी रस्ता वरचा सिमेंटचा भूसा हा अतिशय वेगाने उडून नाका-तोंडात जात आहे. आता पावसाळा सुरू झाला आहे. आता रस्त्यावर पाणी भरलेले खड्डेच खड्डे पाहायला मिळतील. पुढील महिन्यांपासून पर्यटक येण्याची सुरवात होणार आहे. आणि याच रस्त्याच्या खड्यातून पर्यटकांना प्रवास करावा लागणार आहे.
पर्यटकांची संख्या वाढवावी व त्यांचा प्रवास सुखाचा प्रवास व्हावा याकरिता शासनाने करोडो रुपये खर्च करून हा रस्ता बनविला परंतु हा रस्ता ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे सहा महिन्यांच्या आत उखडला गेला. तरी या रस्त्यावर टाकण्यात आलेले स्पीडब्रेकर अतिशय चुकीचे बनवण्यात आले आहेत. ते उंच असल्याने येणारी जाणारी प्रत्यक्ष गाडी जोरात आपटते. अनेकजनांचे अपघात झाले. अनेक गाड्यांना नुकसान सहन करावे लागले. तक्रारी झाल्या परंतु अधिकारी व ठेकेदार यांनी स्पीडब्रेकर ना स्लोप दिला. त्यामुळे पर्यटकांना त्रास सहन करावा लागत आहेत. शासनाचा करोडो रुपयांचे नुकसान करणा-या ठेकेदार व त्यांना सहकार्य करणारे अधिकारी यांची चौकशी करुन त्यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करावी व ठेकेदराला काळ्या यादीत टाकावे अशी ग्रामस्थांची मागणी आहे.
खोरा बंदर जेट्टी कामात त्रुटी असल्याचे दाखून देखील ठेकेदार काम पूर्ण करत नसल्याने त्याला नोटीस देण्यात आली आहे. रस्त्याचे काम पुन्हा नवीन टेंडर काढून लवकरच सुरु होणार आहे. कामाचे परीक्षण झाल्याशिवाय पर्यटकांना जाण्यासाठी जेट्टी खुली होणार नाही. प्रमोद राऊळ, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड