समीर बुटाला
पोलादपूर, पुढारी वृत्तसेवा : मुंबई-गोवा महामार्गावरील बहुचर्चित कशेडीतील दोन्ही बोगदे सोमवारी सायंकाळपासून पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले केले आहेत. वीजपुरवठा खंडित झाल्यास वाहतूक व्यवस्थेत कोणत्याही प्रकारचा अडथळा निर्माण होऊ नये, याकरिता तात्पुरत्या स्वापात जनरेटरची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कायमस्वरुपी वीज पुरवठ्यासाठी अनामत रक्कम भरण्याची प्रक्रिया देखील अंतिम टप्यात असल्याचे सांगितले जात आहे. (Raigad Kashedi Tunnel)
दोन्ही बोगद्यात कायमस्वरुपी वीजपुरवठ्यासाठी राष्ट्रीय महामार्ग खात्याने महावितरणकडे ११ के.व्ही. क्षमतेच्या विजेची मागणी केली असता त्यापोटी ८० लाख रुपयांची अनामत रक्कम भरणा करण्याबाबत सूचित केले होते. अनामत रक्कम भरण्याची प्रक्रिया लांबणीवर पडल्याने शिमगोत्सवात दोन्ही बोगदे पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुले होतील की नाही, याबाबत सांशकता व्यक्त केले जात होती. मात्र, राष्ट्रीय महामार्ग विभागाने दोन्ही बोगद्यात जनरेटरची सुविधा उपलब्ध करण्यासाठी पुढाकार घेतला. दोन्ही बोगद्यात कायमस्वरुपी वीजपुरवठा कार्यान्वित होईपर्यंत विजेचा अडथळा निर्माण झाल्यास जनरेटरवरच बोगद्यातून पूर्ण क्षमतेने वाहतूक सुरू ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यानुसार वाहतूक सुरू करण्यात आली आहे.
कोकणात गणपतीनंतर होळी अर्थात शिमगोत्सवाला चाकरमानी मोठ्या संख्येने जात असतात. रायगड व रत्नागिरी जिल्ह्याच्या दोन्ही सीमा वळणावळणाने जोडत डोंगर पोखरत भुयारी मार्गाने जोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे पोलादपूर ते खेड दीड तासाचे अंतर अवघ्या ४५ मिनिटांत पार होणार आहे. कशेडी घाटातील ४५ मिनिटांचा वळणा वळणाचा घाट मार्ग बोगद्यामुळे फक्त १० मिनिटांत पार करता येणार आहे.
पोलादपूर येथील भोगावपासून सुरु होणारा कशेडी बोगदा खेड मधील कशेडी येथे बाहेर पडणार आहे. हा बोगदा एकूण २ किलोमीटरचा असून या बोगद्याला असलेले रस्ते धरून हा सगळा मार्ग ९ किलोमीटरचा आहे. ९ किलोमीटरच्या मार्गामुळे प्रवाशांचा सुमारे ४० ते ४५ मिनिटांचा वळसा वाचला आहे. त्यातच इंधन ची बचत होत आहे . बोगद्यामुळे खेड तालुक्यातील कशेडी घाट ते रायगड जिल्ह्यातील पोलादपूर हे अंतर अवघ्या दहा मिनिटांत पार करता येत असल्याने अनेक एसटी बसेस खासगी ट्रॅव्हल, ट्रक, कंटेनर, ट्रॅव्हल, लहान वाहने बोगद्या मार्गे जात आहेत.