पनवेल, कर्नाळा; पुढारी वृत्तसेवा: पनवेल तालुक्यातील कर्नाळा पक्षी अभयारण्यात (Karnala Bird Sanctuary) पर्यटनासाठी आलेल्या ५० हून अधिक पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला केला. ही घटना आज (दि.१५) सकाळी साडे अकराच्या सुमारास घडली. यात संदीप शर्मा (वय ४८, रा. कोपरखैरणे, नवी मुंबई) हे बेशुद्ध झाले. तर त्यांच्या पत्नी चारू शर्मा (वय ४४) आणि लक्षपुरोहित (वय ९) जखमी झाले असून त्यांना नजीकच्या रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. इतर पर्यटकांनी उपचारासाठी स्वतः हून पनवेल आणि मुंबई परिसरातील खासगी रुग्णालयाकडे धाव घेतली आहे. (Raigad News)
आज सकाळी कर्नाळा अभयारण्यात पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांवर साडे अकरा वाजण्याच्या सुमारास ५० हून अधिक पर्यटकांवर मधमाशांनी हल्ला चढविला. हे सर्व पर्यटक मिळून कर्नाळा किल्ल्याकडे चालत जात होते. अभयारण्यातून वाट काढताना अचानक मधमाश्यांच्या थव्याने या पर्यटकांवर हल्ला चढवला. मधमाशांचा थवा मोठा असल्याने पर्यटक स्वतःला वाचवण्यासाठी पळापळ करू लागले. यावेळी या पर्यटकांमध्ये एक पर्यटक बेशुद्ध झाला. त्याला इतर पर्यटक आणि वन कर्मचाऱ्यांनी जवळील रूग्णालयात दाखल केले. बेशुद्ध अवस्थेत आलेल्या दोन पर्यटकांना जवळच्या रूग्णालयात दाखल केले.
जखमी चारु शर्मा यांनी 'दै. पुढारी'शी बोलताना सांगितले की, मधमाशांचा थवा अचानक कोठून आला, हे आम्हाला कळलेदेखील नाही. विशेष म्हणजे हा हल्ला झाल्यानंतर तत्काळ आम्हाला सेवा उपलब्ध झाल्या नाहीत. अभयारण्यामध्ये इमर्जन्सी मदतीसाठी अँब्युलन्स किंवा इतर कोणतीही व्यवस्था नाही. कर्नाळा अभयारण्य व्यवस्थापनाकडून येणाऱ्या पर्यटकांना सावधानतेबाबत कोणत्याही सूचना दिल्या नाहीत. त्यात किल्ल्याकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाल्यामुळे वेळेवर मदतही मिळाली नाही. या बाबत जखमी पर्यटकांनी नाराजी व्यक्त केली.