सणांच्या पार्श्वभूमीवर अलिबागेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात शांतता समितीची बैठक घेण्यात आली.  Pudhari News Network
रायगड

रायगड : शांतता समितीच्या सभेला महत्त्वाचे लोकप्रतिनिधीच गैरहजर

समितीच्या सदस्यांनी वेधले लक्ष; आगामी सणांच्या पार्श्वभूमीवर सभेचे आयोजन; सोशल मिडियावर राहणार करडी नजर

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : सुवर्णा दिवेकर

सणांच्या पार्श्वभूमीवर अलिबागेत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात शांतता समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. मात्र महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे वगळता अन्य महत्वाच्या लोकप्रतिनिधींनी या बैठकीकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले.

आगामी गुढीपाडवा, रमजान ईद, महावीर जयंती, राम नवमी, हनुमान जयंती आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती या सण आणि उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्यासह पोलीस आणि महसूल विभागाचे अधिकारी आणि शांतता समितीचे पदाधिकारी आणि सदस्य उपस्थित होते.

या बैठकीत राज्यभरात गेल्या काही महिन्यात घडलेल्या सामाजिक तेढ आणि वाद निर्माण करणार्‍या विविध घटनांबाबत चिंता व्यक्त केली गेली. सोशल मीडियाच्या माध्यमातून सामाजिक व्देष पसरवण्याचे काम समाजकंटकांकडून केले जात आहे. जाणीवपूर्वक प्रक्षोभक आणि सामाजिक अशांतता निर्माण होईल असा मजकूर समाजमाध्यमांवर प्रसारित केला जातात ज्यामुळे परिस्थिती बिघडते. त्यामुळे समाज माध्यमांवर प्रसारित होणार्‍या संदेशांवर नजर ठेवा अशी मागणी खालापूर तालुक्यातील सुनील पाटील यांनी केली. रोह्यातील समीर शेडगे यांनीही या मागणीला दुजोरा दिला.

दरम्यान, अलिबाग येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात जिल्हास्तरीय सोशल मीडिया सेलची स्थापना करण्यात आली असून पाच कर्मचारी आणि एक अधिकारी नियुक्त करण्यात आल्याचे यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी स्पष्ट केले. त्यावर प्रत्येक तालुक्यात सोशल मिडीया निरक्षण सेल कार्यरत करण्याचे सभेच्या अध्यक्षांनी दिले.

सण उत्सव काळात वीज पुरवठा आणि पाणी पुरवठा सुरळीत ठेवावा, धार्मिक स्थळांच्या इथे जादा पोलीस बंदोबस्त ठेवावा, वाहतूक नियमन प्रभावीपणे करावे, आरोग्य यंत्रणा तैनात ठेवावी या सारख्या मागण्या या बैठकीत करण्यात आल्या. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षेखाली ही बैठक झाली.

दरम्यान, जिल्हास्तरीय शांतता समितीच्या बैठकीसाठी जिल्ह्यातील सर्व आमदार आणि मंत्र्यांना निमंत्रित करण्यात आले होते. मात्र मंत्री आदिती तटकरे यांचा अपवाद सोडला तर शिवसेना आणि भाजपाचे आमदार उपस्थित राहिले नाहीत. रोजगार हमी मंत्री भरत गोगावले हे देखील बैठकीपासून लांब राहिले. स्थानिक आमदार महेंद्र दळवी ही बैठकीसाठी उपस्थित राहिले नाहीत. यावेळी खासदार व आमदारांच्या गैरहजेरीकडे शांतता समिती सदस्य आणि काँग्रेस नेते राजेंद्र ठाकूर यांनी लक्ष वेधले.

गैरहजेरीसाठी विशेष कारण नाही...

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवन सभागृहात आयोजित शांतता समितीच्या सभेला एक मंत्री, खासदार, पाच आमदार गैरहजर होते. याबाबत राज्याचे रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले यांना संपर्क साधला असता, त्यांनी सांगितले की, शांतता कमिटीच्या सभेला गैरहजर राहण्याबाबत विशेष कारण नाही. महाडमध्ये कार्यक्रम असल्यामुळे उपस्थित राहू शकलो नाही. तर पेणचे आमदार रवींद्र पाटील यांनी सांगितले की, स्थानिक कार्यक्रमांमध्ये असल्याने शांतता कमिटीच्या सभेला उपस्थित राहता आले नाही. तर कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी सांगितले की, अधिवेशनानंतर आल्याने कार्यकर्त्यांची गर्दी होती. त्यामुळे शांतता कमिटीच्या बैठकीला उपस्थित राहता आले नाही. तर जिल्ह्यातील उर्वरित आमदारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता झाला नाही.

गुढीपाडवा शोभा यात्रा

  • अलिबाग 1

  • पेण 2

  • कर्जत 1

  • रोहा 3

  • खोपोली 2

  • श्रीवर्धन 1

  • महाड शहर 1

  • कोलाड 1

  • मांडवा 1

  • पाली 1

  • मुरुड 3

  • माणगाव 2

  • नेरळ 1

  • नागोठणे 1

  • गोरेगाव 1

  • पोयनाड 1

  • पोलादपूर 1

  • रसायनी 1

  • एकूण 22

नेमण्यात आलेला बंदोबस्त

  • पोलीस अधिकारी - 85

  • पोलीस कर्मचारी - 975

  • ठउझ प्लाटून - 02

  • जठढ प्लाटून - 01

  • स्ट्रायकिंग - 11 प्लाटून

  • वाहतूक कर्मचारी - 90

  • डठझऋ प्लाटून - 250

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT