मुरुड जंजिरा ः मुरुड तालुक्यातील काशीद, मुरुड, नांदगाव व ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे.मुरुडसह श्रीवर्धन, अलिबाग, नागाव रेवदंडा, आक्षी, किहीम आदींसह सर्वच ठिकाणे पर्यटकांनी हाऊ स फुल झाली आहेत.राजपुरी येथे जंजिरा किल्ल्याचे तिकीट काढण्यासाठी पर्यटकांची गर्दी झाली.
सायंकाळी 4 वा. समुद्राचे पाणी ओहोटी असल्याने कमी झाले आहे.पाणीजेट्टीला लागत नसल्याने शेकडो पर्यटक किल्ला न पाहतच परतले.दुसऱ्या दिवशी सकाळी एकत्र आल्याने जेटीवर गर्दी झाली.शाळांच्या सहली दरदिवशी 12 गाड्या येत असल्याने जंजिरा किल्ल्यात जाणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी होती.
समुद्र किनारी मोठ्या संख्येने पर्यटक अवतरले असून नाताळ सुट्टीचा आनंद घेत आहेत. पर्यटकांनी शनिवारी सायंकाळपासून गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. हळूहळू सर्व लॉज फुल झाल्या आहेत. समुद्र किनारी असणाऱ्या प्रत्येक स्टॉलवर गर्दी पहावयास मिळत आहे.
आज जंजिरा किल्ल्यावर सुद्धा मोठी गर्दी पहावयास मिळाली. औरंगाबाद,पुणे,कोल्हापूर, लातूर, परभणी, मुंबई, कल्याण, डोंबवली, विरार, दहिसर, ठाणे आदी भागातील पर्यटक मोठ्या संख्येने येथे हजर झाले आहेत.रस्त्याच्या दोन्ही बाजूस वाहनांची मोठी गर्दी दिसत असून काही काळ वाहतूककोंडी झाली होती.
माथेरानचे पर्यटन बहरले
सलग सुट्ट्यांमुळे माथेरानचे पर्यटन बहरले असून दिवसेंदिवस वाढत असलेल्या पर्यटकांमुळे येथील व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मागील दोन दिवसांपासून माथेरानमध्ये पर्यटकांची संख्या वाढली आहे. सुट्यांमध्ये थंडीच्या काळात माथेरान हे लोकांच्या आवडत्या ठिकाणांपैकी एक आहे. पर्यटकांची संख्या वाढू लागल्याने घाटामध्ये वाहतूक कोंडीच्या समस्येने पुन्हा डोकेवर काढले असून घाटामध्ये लांबच्या लांब रांगा पहावयास मिळत आहे.