रायगड

Raigad rainfall : रायगड जिल्ह्यात मुसळधार: माथेरान, पनवेलमध्ये सर्वाधिक पाऊस; २४ तासांत सरासरी १२२.८३ मिमीची नोंद

Maharashtra rain | रोहा आणि पोलादपूर तालुक्यात मात्र पावसाचा जोर इतर तालुक्यांच्या तुलनेत कमी राहिला

पुढारी वृत्तसेवा

रायगड : जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सर्वत्र जोरदार पाऊस झाला असून, आज (२ जुलै) सकाळी ९.०० वाजेपर्यंत जिल्ह्यात एकूण १९६५.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याची आजची २४ तासांची सरासरी १२२.८३ मिमी इतकी असून बहुतांश तालुक्यांमध्ये मुसळधार पावसाचा जोर कायम आहे.

जिल्ह्यातील पाऊसाचा आढावा घेतला असता, पर्यटन स्थळ असलेल्या माथेरान आणि पनवेल परिसराला पावसाने अक्षरशः झोडपून काढले आहे. माथेरानमध्ये जिल्ह्यात सर्वाधिक २०८ मिमी, तर पनवेलमध्ये १९१.४ मिमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. त्याखालोखाल कर्जत तालुक्यात १५२ मिमी, श्रीवर्धनमध्ये १३९ मिमी, म्हसळयात १३८ मिमी आणि जिल्हा मुख्यालय असलेल्या अलिबागमध्ये १३६ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

तळा तालुक्यात १३५ मिमी आणि माणगावमध्ये १२३ मिमी पाऊस झाला असून पेण आणि खालापूर या दोन्ही तालुक्यांत प्रत्येकी १२० मिमी पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय उरणमध्ये १०४ मिमी आणि सुधागड तालुक्यात १०२ मिमी पाऊस पडला आहे. महाड आणि मुरुड तालुक्यात पावसाचा जोर काहीसा मध्यम स्वरूपाचा होता, येथे अनुक्रमे ९७ मिमी आणि ९० मिमी पाऊस नोंदवला गेला.

रोहा आणि पोलादपूर तालुक्यात मात्र पावसाचा जोर इतर तालुक्यांच्या तुलनेत कमी राहिला. पोलादपूरमध्ये ६२ मिमी, तर रोहा तालुक्यात जिल्ह्यात सर्वात कमी म्हणजेच ४८ मिमी पावसाची नोंद झाली आहे. रोहा आणि पोलादपूर वगळता जिल्ह्यातील इतर सर्व १४ तालुक्यांमध्ये पावसाने शंभरी ओलांडली आहे. सखल भागात पाणी साचण्याची शक्यता असून प्रशासनाने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT