सुवर्णा दिवेकर
अलिबाग : रायगड जिल्ह्याला सलग पाचव्या दिवशी जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून प्रमुख नद्यांच्या पाण्याच्या पातळीत सातत्याने वाढ होत आहे. आंबा, कुंडलिका आणि पाताळगंगा नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे रोहा, नागोठणे आणि खालापूर परिसरामध्ये पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. गावागावांतील नद्या-नाले ओसंडून वाहत असून, ठिकठिकाणी नागरी वस्त्यांमध्ये पाणी शिरले आहे. मुंबई-गोवा महामार्गासह जिल्ह्यातील अंतर्गत रस्ते पाण्याखाली गेल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. अनेक ठिकाणी डोंगर खचण्याच्या, झाडे आणि त्यांच्या फांद्या उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत. रस्त्यांवरील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागत असून, वीजपुरवठाही खंडित होत आहे.
दरम्यान, सोमवारीही पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेतली आहे. दरडग्रस्त व पूरग्रस्त गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला असून शोध व बचाव पथक, रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांना जिल्हा प्रशासनाच्या परवानगीशिवाय मुख्यालय सोडण्यास बंदी घालण्यात आली आहे.
रायगड जिल्ह्यातील कोलाड लघु पाटबंधारे विभागाच्या अखत्यारित असलेल्या २८ धरणांची पाणी पातळी झपाट्याने वाढू लागली आहे. सध्या या धरणांमध्ये एकूण ६५.८३ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. २८ पैकी १३ धरणे पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागली आहेत, तर उर्वरित धरणांमधील पाणीसाठ्यातही मोठी वाढ झाली आहे.
रायगड जिल्ह्यात रविवारी सकाळी ९ वाजेपर्यंत २१५.४६ मिलीमीटर सरासरीसह एकूण ३ हजार ४४७.२ मिलीमीटर पाऊस पडला.
अलिबाग: १९६ | मुरुड: २५८ | पेण: २६५ | पनवेल: २८२.२
उरण: १४८ | कर्जत: २९१ | माथेरान: ४०८ | खालापूर: २७४
रोहा: १७१ | सुधागड: २२२ | माणगाव: १८८ | तळा: १९२
महाड: १२१ | पोलादपूर: १११ | म्हसळा: २१८ | श्रीवर्धन: १०२
मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठणे-कोलाड दरम्यान असलेल्या सुकेळी खिंड आणि जिंदाल कंपनीजवळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी आले. यामुळे महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली. पाण्यातून वाहने काढताना वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली. नागोठणे-रोहा मार्गावरील भिसे खिंडीत रविवारी सकाळी झाड पडल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती; मात्र नागोठणे पोलिसांनी जेसीबीच्या साहाय्याने झाड आणि डोंगरावरून आलेली माती हटवून रस्ता खुला केला.
अलिबाग तालुक्यातील महाजने येथील नदीच्या पुरात एक वयोवृद्ध आदिवासी दाम्पत्य वाहत जात होते. नदीकाठावर असलेल्या सुभाष औचटकर व प्रेमनाथ पारंगे या दोन तरुणांच्या ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता नदीच्या वेगवान प्रवाहात उडी घेतली आणि वृद्ध दाम्पत्याला सुखरूप किनाऱ्यावर आणून त्यांचे प्राण वाचवले. त्यांच्या या धाडसाचे कौतुक होत आहे.
रोहा तालुक्यातील कुंडलिका आणि महिसदरा नदीने धोक्याची पातळी ओलांडल्यामुळे बाहे-देवकान्हे हद्दीत असलेल्या 'एस.पी. फार्म'मध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली. येथे पर्यटनासाठी आलेले २० पर्यटक आणि २ केअर टेकर असे एकूण २२ जण पुराच्या पाण्यात अडकले होते. प्रशासनाने सागर डहिंबेकर यांच्या रेस्क्यू टीम आणि बाहे गावातील तरुणांच्या सहकार्याने या सर्वांना सुखरूप बाहेर काढले.
रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे सारसई येथे कर्जत–पेण मार्गावरील एक एसटी बस पाताळगंगा नदीच्या पुरामध्ये अडकली. बसमध्ये एकूण ८ प्रवासी होते. घटनेची माहिती मिळताच रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभिजीत भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मुसळधार पाऊस आणि पाण्याचा वाढता प्रवाह लक्षात घेऊन पोलिसांनी 'हेल्प फाउंडेशन रसायनी'च्या सदस्यांच्या मदतीने धाडसी बचावकार्य राबवले आणि बसमधील सर्व ८ प्रवाशांची सुरक्षित सुटका केली.