जिल्हाधिकारी किशन जावळे 
रायगड

Raigad Heavy Rain | रायगड जिल्ह्यात पावसाचा हाहाकार; ६ जुलै रोजी शाळांना सुट्टी, जिल्हाधिकारी किशन जावळे यांचे सतर्कतेचे आवाहन

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : रायगड जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांपासून सतत मुसळधार पाऊस सुरू असून, गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आहे. या वाढत्या पूरपरिस्थितीचा सामना करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी मोठा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी जिल्ह्यातील सद्यस्थितीची माहिती देताना सर्व नागरिक, शिक्षक, पालक आणि शाळा व्यवस्थापनाला या आदेशाचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.

नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी; सावित्री नदीला पूर

जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यातील महत्त्वाच्या ३ नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली होती. तर महाडमधील सावित्री नदीने देखील इशारा पातळी ओलांडली होती. दुपारनंतर ओहोटी सुरू झाल्याने नद्यांच्या पाण्याच्या पातळीत काहीशी घट झाली असली, तरी पावसाचा जोर कायम असल्याने धोका अद्याप टळलेला नाही. महाबळेश्वर आणि लोणावळा परिसरात जवळपास १७५ मिमी पेक्षा जास्त पाऊस झाल्याने नद्यांमध्ये पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.

दरड प्रवण आणि पूरग्रस्त गावांना सतर्कतेचा इशारा

जिल्ह्यातील वाढता धोका लक्षात घेऊन प्रशासनाने खालील महत्त्वाचे उपाय आणि आवाहन केले आहे नदीकाठच्या आणि पुराचा धोका असलेल्या गावांमधील नागरिकांनी आपल्या घरात न थांबता सुरक्षित ठिकाणी किंवा प्रशासनाने उभारलेल्या निवाऱ्यात स्थलांतरित व्हावे. दरड कोसळण्याची शक्यता असलेल्या (दरड प्रवण) गावांमधील नागरिकांनी रात्रीच्या वेळी दरडीच्या खाली किंवा धोकादायक घरात मुक्काम करू नये. त्यांनी तात्पुरत्या स्वरूपात शाळा, समाजमंदिर किंवा नातेवाईकांकडे आश्रय घ्यावा असे आवाहन कले आहे.

दरड कोसळण्याचा धोका का वाढला?

सततच्या मुसळधार पावसामुळे डोंगरावरील माती पाण्यात मिसळून वाहून जात आहे. त्यामुळे मोठे दगड आणि कडे सैल होऊन खाली घसरण्याची (दरड कोसळण्याची) तीव्र शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांनी स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेऊन प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT