रायगड

Pen Heavy Rain : पेण तालुक्याला ‘मुसळधार’ तडाखा! खरोशीत ८० घरांत घुसके पाणी, बाळगंगा-भोगावती नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी

हमरापूर विभागात पूरस्थिती; तांबडशेत येथील गणेशमूर्ती कार्यशाळांमध्ये ३ ते ४ फूट पाणी, शेकडो मूर्ती भिजल्या

पुढारी वृत्तसेवा

पेण : पेण तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून पडणाऱ्या पावसाने शनिवारच्या (दि. ४) रात्रीपासून अधिकच उग्र रूप धारण केले होते. रविवारी (दि. ५) सकाळपर्यंत तालुक्यात २५६ मिमी, तर दुपारपर्यंत २८० मिमी इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली. या मुसळधार पावसामुळे रविवारी दिवसभर शहर आणि ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून, नागरिकांना ये-जा करण्यात प्रचंड अडथळे आले.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पेण तालुका प्रशासन आणि नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी शहरातील भोगावती नदी किनारा, बाळगंगा नदी परिसर आणि खरोशी या पूर व दरडग्रस्त गावांना प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली.

पेण तालुक्याला गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. तालुक्यातील भोगावती, बाळगंगा आणि पाबळ नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये रविवारी सकाळपासूनच पूर आले होते. आंतोरा, तरणखोप, बारीवाडी, राधाकृष्ण वाडी, खरोशी, दुरशेत आणि वरसई या बाळगंगा नदीकाठच्या गावांमध्ये पाणी शिरल्याने गावांना जोडणारे प्रमुख रस्ते वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद झाले आहेत.

खरोशी गावात डोंगरालगत असलेल्या एका घरावर आधी झाड कोसळले. त्यानंतर डोंगराचा एक मोठा दगड गडगडत खाली येऊन घराच्या भिंतीवर आदळल्याने भिंतीला मोठे भगदाड पडले. स्थानिक पोलीस पाटील, सरपंच आणि ग्रामसेवकांनी तातडीने या घटनेची पाहणी केली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. दुसरीकडे, मुंगोशी-बेलवडे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची पूर्णपणे वाताहत झाली आहे. या गावातून ये-जा करण्यासाठी रस्ताच शिल्लक राहिलेला नाही. सर्वत्र चिखल, खड्डे आणि वाहणारे पाणी यांमुळे नागरिकांना पाण्यातून वाट काढताना मोठी कसरत करावी लागत आहे.

पूरग्रस्त भागाची जिल्हा परिषद सभापतींकडून पाहणी

सततच्या मुसळधार पावसामुळे पेण तालुक्यातील हमरापूर विभागातील तांबडशेत गावात पूरस्थिती निर्माण झाली असून, अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा परिषदेचे सभापती वैकुंठ पाटील यांनी पूरग्रस्त भागाचा दौरा केला. गावातील रस्त्यांवर आणि घराघरांमध्ये तीन ते चार फूट पाणी साचले असतानाही त्यांनी प्रत्यक्ष पाण्यात उतरून परिस्थितीची पाहणी केली.

येथील प्रसिद्ध श्री गणेशमूर्ती कार्यशाळांमध्येही तीन ते चार फूट पाणी भरल्यामुळे शेकडो मूर्ती पाण्यात भिजल्या आहेत. या कार्यशाळांना भेट देऊन त्यांनी झालेल्या नुकसानाचा अंदाज घेतला. तसेच पूरग्रस्त कुटुंबांच्या अडचणी जाणून घेतल्या. स्थानिक प्रशासनाशी तातडीने संपर्क साधून पूरग्रस्तांना आवश्यक ती मदत आणि उपाययोजना करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

"पूरग्रस्त भागातील नागरिकांना तातडीने मदत पोहोचवणे आणि रस्त्यांची डागडुजी करणे हे प्रशासनाचे मुख्य कर्तव्य आहे. नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."
— वैकुंठ पाटील, सभापती, रायगड जिल्हा परिषद

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT