Raigad heavy rainfall pudhari photo
रायगड

Raigad heavy rainfall : रायगडमधील तीन हजार घरांना अतिवृष्टीचा फटका

१२६ दुकानांमध्ये पाणी; पोल्ट्री फार्मचे नुकसान; महाड, पोलादपुरात शाळा इमारती बाधित

पुढारी वृत्तसेवा

अलिबाग : गेल्या पंधरा दिवसात झालेला मुसळधार पाऊस आणि वादळी वारे यामुळे रायगड जिल्ह्यात तीन हजार घरांमध्ये पावसाचे पाणी घुसून नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे जिल्ह्यातील २६ गावांतील ४९३ कुटुंबांतील १५९८ नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. याचबरोबर जिल्हयातील सार्वजनिक मालमत्तांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महाड, रोहामध्ये व्यापारी वर्गाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्हा प्रशासनाने तातडीने पंचनामे सुरु करावेत अशी मागणी नुकसानग्रस्तांकडून होत आहे.

यावर्षी मोसमी पावसाने उशिरा सुरुवात केली. त्यामुळे रायगड जिल्हयात पाणीटंचाईसह शेतीच्या नियोजनावरही परिणाम होण्याची भीती निर्माण झाली होती. मात्र वीस जूनपासून जिल्हयात मोसमी पावसाला सुरुवात झाली. गेल्या पंधरा दिवसात जिल्हयात ठिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे. गेल्या तीन-चार दिवसात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस झाला.

७ जुलै रोजी सकाळपर्यंत जिल्ह्यात १४५ टक्के पाऊस झाला आहे. सर्वाधिक पाऊस उरण, मुरुड, अलिबाग, पनवेल या तालुक्यात झाला आहे. असे असले तरी तीन चार दिवसातील पावसाने आतापर्यंतची सरासरी भरून काढली आहे. मागील तीन-चार दिवसात अतिवृष्टीमुळे रायगड जिल्हयात हाहाकार उडाला. झालेल्या नुकसानीचे पंचनामे होण्यासाठी प्रशासनाने तातडीने कारवाई सुर केली आहे.

गेल्या तीन - चार दिवसात झालेला मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील २४ कच्च्या घरांचे पूर्णत नुकसान झाले आहे. १७३ कच्च्या घरांचे अंशत नुकसान झाले आहे. जिल्ह्यात पक्क्या १५४ घरांचे अंशत नुकसान झाले आहे. तर १७३ पक्क्या घरांचे अंशत नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील एक झोपडीचे नुकसान झाले आहे. तर गुरांचे ३३ गोठे, पाच पोल्ट्री फार्म यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ठिकठिकाणच्या १२६ दुकानांमध्ये पाणी शिरून व्यावसायिकांचे नुकसान झाले असून तातडीने पंचनामे करण्याची मागणी होत आहेत.

जिल्ह्यातील मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे कर्जत आणि रोहा तालुक्यात मंदिर, उरण आणि महाड तालुक्यात शाळा इमारत आणि पोलादपूर तालुक्यातील स्मशानभूमी, सभामंडप आणि शाळा इमारतीचे नुकसान झाले आहे.

पूर स्थिती आणि दरडींच्या धोक्यामुळे जिल्ह्याील पोलादपूर, पनवेल, कर्जत, म्हसळा, खालापूर, माणगाव, तळा, महाड, अलिबाग या तालुक्यांतील २६ गावांतील ४९३ गावांना स्थलांतरीत करण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT