रायगड

Raigad news: रायगड जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनिषा विखे निलंबीत

District Health Officer news: निलंबनाच्या काळात त्या खाजगी नोकरी, व्यापार किंवा उद्योगधंदा करू शकणार नसल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले आहे

पुढारी वृत्तसेवा

जयंत धुळप

रायगड : जिल्ह्याच्या जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. मनीषा विखे यांना अखेर निलंबित करण्यात आले आहे. त्यांच्या कार्यपद्धतीबाबत प्राप्त झालेल्या तक्रारीवरून त्यांची प्राथमिक चौकशी करण्यात आली. सादर करण्यात आलेल्या अहवालातील निरीक्षणांच्या आधारे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई आली आहे.

महाराष्ट्र शासनाचे कार्यासन अधिकारी प्रे. ज्ञा. सोनटक्के यांनी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ नुसार तत्काळ निलंबनाचे आदेश पारित केले आहेत. पुढील आदेश मिळेपर्यंत डॉ. विखे निलंबित असणार आहेत.

निलंबन कालावधीतील निर्देश

निलंबन आदेश अमलात असेपर्यंत डॉ. विखे यांचे मुख्यालय उप संचालक, आरोग्य सेवा, मुंबई मंडळ, ठाणे येथे निश्चित करण्यात आले आहे. त्यांना सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगीशिवाय मुख्यालय सोडता येणार नाही. निलंबनाच्या काळात त्या खाजगी नोकरी, व्यापार किंवा उद्योगधंदा करू शकणार नाहीत. असे केल्यास ते गैरवर्तन मानले जाईल आणि त्या निर्वाहभत्ता मिळण्यास अपात्र ठरतील. निलंबन कालावधीत त्यांना निर्वाहभत्ता व इतर पूरक भत्ते देण्यात येतील, असे आदेशात स्पष्ट केले आहे.

आरोग्यमंत्र्यांकडे दाद मागणार या निलंबन आदेशावर डॉ. मनीषा विखे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, एका निनावी पत्रावरून माझी चौकशी झाली. मात्र, मला चौकशी अहवाल दिला नाही किंवा माझे म्हणणे मांडण्याची नियमानुसार संधीही देण्यात आली नाही. त्यामुळे हा निलंबन आदेश योग्य नाही. मला खात्री आहे, मी कोणताही गैरप्रकार वा गैरवर्तन केलेले नाही. त्यामुळे मी राज्याच्या आरोग्यमंत्री महोदयांकडे या निर्णयाविरुद्ध दाद मागणार आहे.
डॉ. मनीषा विखे, रायगड जिल्हा आरोग्य अधिकारी

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT