Raigad Robbery | मित्रानेच रचला ५७ तोळे सोन्याच्या दागिन्यांच्या लुटीचा कट...! 
रायगड

Raigad Robbery | मित्रानेच रचला ५७ तोळे सोन्याच्या दागिन्यांच्या लुटीचा कट...!

पत्नी व साथीदारांच्या मदतीने मित्रावरच चाकू हल्ला; सात आरोपींना अटक, मुद्देमाल जप्त

पुढारी वृत्तसेवा

पनवेल : खारघर परिसरात ५७ तोळे सोन्याचे दागिने लुटण्यासाठी मित्रानेच पत्नी आणि साथीदारांच्या मदतीने कट रचल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. मित्रावर चाकूने हल्ला करून ५७ तोळे सोन्याच्या दागिन्यांची बॅग जबरीने लुटणाऱ्या सात जणांच्या टोळीला खारघर पोलिसांनी अटक केली असून, लुटलेले सर्व सोन्याचे दागिने, शस्त्रे आणि गुन्ह्यात वापरलेली वाहने जप्त करण्यात आली आहेत.

खारघर येथील रहिवासी सुशांत नामदेव मोरे (वय ३७) हे २२ एप्रिल रोजी मित्रांसोबत बेलापूर येथील एका हॉटेलमध्ये जेवणासाठी गेले होते. रात्री जेवण करून ते मित्रांसोबत घरी परतले. कार पार्क करून घराकडे पायी जात असताना अचानक त्यांच्या पाठीमागून तीन अनोळखी इसम धावत आले. आरोपींनी मोरे आणि त्यांच्या मित्रांसोबत झटापट करत मारहाण केली. यावेळी मोरे यांच्या हातावर चाकूने वार करून त्यांना जखमी करण्यात आले. त्यानंतर चालक महेश हाटे यांच्या हातातील ५७ तोळे सोन्याचे दागिने असलेली पिशवी जबरीने हिसकावून आरोपी फरार झाले. या प्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम ३०९(६), ३(५) आणि ६१(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सहायक पोलीस आयुक्त विक्रम कदम यांच्या मार्गदर्शनाखाली खारघर, तळोजा, कामोठे आणि कळंबोली पोलीस ठाण्यांची चार विशेष तपास पथके तयार करण्यात आली. पोलिसांनी तांत्रिक तपास, माहितीदारांचे जाळे आणि विविध ठिकाणी शोधमोहीम राबवत तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली. फिर्यादीचा मित्र अभिनंदन माळी यानेच पत्नी, मेव्हणा आणि गावाकडील साथीदारांच्या मदतीने संपूर्ण कट रचल्याचे उघड झाले. पोलिसांनी २७ एप्रिल रोजी अभिनंदन तानाजी माळी, त्याची पत्नी कोमल माळी आणि वैभव माळी यांना अटक केली.

यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश दळवी यांच्या पथकाने सातारा जिल्ह्यातील वडूज परिसरातून शुभम पाटोळे आणि संदीप गुजंळे या दोन आरोपींना ताब्यात घेत अटक केली. दरम्यान, मुख्य आरोपी हर्षद सागरे आणि राहुल उर्फ अमित माळी हे गुन्ह्यानंतर तेलंगणा, सांगली, सातारा, सोलापूर आणि पंढरपूर परिसरात बाळूमामांच्या पालखीत फिरून पोलिसांची दिशाभूल करत होते. मात्र, पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे पंढरपूर तालुक्यातील तावशी येथून दोघांना ताब्यात घेत ७ मे रोजी अटक केली.

पोलिसांनी आरोपींकडून लुटलेले ५७ तोळे सोन्याचे दागिने, गुन्ह्यात वापरलेली शस्त्रे, मारुती स्विफ्ट कार आणि रायडर मोटारसायकल जप्त केली आहे. सध्या पाच आरोपी न्यायालयीन कोठडीत असून दोन मुख्य आरोपींना १५ मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या संपूर्ण कारवाईत खारघर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जोशी, पोलीस निरीक्षक अशोक डमाळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद बरकडे, गणेश दळवी, निलेश येवले, नितीन शिंदे तसेच विविध पोलीस अंमलदारांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT