जिल्हा परिषदेच्या 63 शाळा अंधारात असल्याचा प्रकार समोर आला आहे. Pudhari News Network
रायगड

रायगड : ग्रामीण भागातील ज्ञानमंदिरे अंधारात

बील न भरल्याने रायगड जिल्हा परिषदेच्या 63 शाळांमधील वीज पुरवठा बंद

पुढारी वृत्तसेवा

रायगड : ज्ञानाचा प्रकाश सर्वत्र पसरावा, अज्ञान रुपी अंधार दूर व्हावा यासाठी झटणार्‍या शाळामध्येच अंधार निर्माण होण्याची वेळ आली आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये वीज पुरवठा करण्यात जिल्हा परिषद अकार्यक्षम ठरली. जिल्हा परिषदेच्या 63 शाळा अंधारात असल्याचा प्रकार समोर आला आहे.

प्राथमिक शिक्षण विभागाकडून ही यादी घेण्यात आली आहे. शाळांना वीज पुरवठा व्हावा यासाठी शिक्षण विभागाकडून प्रयत्न होत नसल्याचे सांगितले जात आणहे. शिक्षण विभागाच्या गलथान कारभारामुळे डिजीटल शिक्षणाला हरताळ बसण्याची शक्यता असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावरही त्याचा परिणाम होत असल्याचे चित्र स्पष्ट होऊ लागले आहे.

रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या सुमारे अडीच हजार शाळा आहेत. या शाळेमध्ये 95 हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. पाच हजारहून अधिक शिक्षक विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम करतात. जिल्हा परिषद शाळेत शिकणार्‍या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आले आहेत. डिजीटल शिक्षण देण्यासाठी शाळांमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून प्रोजेक्टर उपलब्ध करण्यात आले. यातून आधुनिक पध्दतीने खेळता-खेळता शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र आज जिल्ह्यातील 63 शाळा गेल्या अनेक दिवसांपासून अंधारात असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. शाळा अंधारात असल्याने शाळेतील प्रोजेक्टर, पंखे, विद्युत दिवे बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत असताना डिजीटल शिक्षणाला हरताळ फासला आहे.

शाळेत वीज पुरवठा करण्यासाठी शिक्षण विभागाकडून अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याचे दिसून आले आहे. फक्त गटशिक्षण अधिकारी यांना सूचना देऊन आपली जबाबदारी पूर्ण झाल्याचे काम त्यांच्याकडून होत आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाच्या या गलथान कारभाराबाबत नाराजीचे सूर उमटत आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे शिक्षण विभाग गांभीर्याने लक्ष देत नसल्याची प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच शिक्षणाधिकारी यांनी लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे. जिल्ह्यातील शाळांचे विद्युत बील संयुक्त शाळा अनुदान व 15 वित्त आयोगाच्या निधीतून भरण्याची सूचना जिल्हा परिषद शिक्षण विभागाकडून करण्यात आली आहे. अलिबाग तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक शाळांचे वीज बील थकीत राहिले आहे.

संयुक्त शाळा अनुदानातून शाळेने तसेच 15 व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीने शाळेतील वीज बील भरण्याच्या सूचना करण्यात आल्या आहेत. गट शिक्षणाधिकारी यांना पत्र दिले आहे. तसेच ज्या शाळांमध्ये अंधार आहे, त्याबाबतही सूचना केली आहे. परंतु कार्यवाही झाली नसल्यास संबंधितांविरोधात कारवाई केली जाईल.
पुनिता गुरव, शिक्षणाधिकारी, प्राथमिक विभाग, रायगड जि.प.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT